वाढदिवसाचा खर्च टाळून राबविला सामाजिक उपक्रम
शबनम न्युज | भोसरी
भोसरी विधानसभा मतदारसंघातील चऱ्होली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील अण्णा काटे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा खर्च टाळून समाज उपयोगी उपक्रम राबविला आहे. त्यांनी समाजाला उपयोगी होईल, या उद्देशाने रुग्णवाहिकाचे लोकार्पण केले आहे. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. हिराबाई किसन लांडगे व सुनील अण्णा काटे यांचे आजोबा कै. पांडुरंग शंकरराव काटे यांच्या स्मरणार्थ सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते सुनील अण्णा काटे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. सुनील अण्णा काटे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवितात यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर अशा अनेक नागरिकांना आरोग्याला उपयोगी पडतील असे उपक्रम यापूर्वी राबविले आहे. त्यांनी आपला समाजसेवेचा वारसा पुढे नेत असताना स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने रुग्णवाहिका नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा प्रसंगी आमदार महेश लांडगे, मा. महापौर नितीन आप्पा काळजे व खेड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजारामजी लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने चऱ्होली परिसरातील असंख्य नागरिक, माता-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्व उपस्थितितांचे सुनील अण्णा काटे यांनी आभार व्यक्त केले.