शबनम न्युज | मुंबई
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आजपासून पाचव्या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या २२ क्रीडा प्रकारांत महाराष्ट्राच्या एकूण ३७७ सदस्यांचा संघ सहभागी होत आहे. यामध्ये टेबल टेनिस, खो- खो, बॉक्सिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, तिरंदाजी, नेमबाजी, कयाकिंग व कनोइंग, योगासन, गटका, सायकलिंग ट्रॅक, ॲथलेटिक्स, कबड्डी, वेटलिफ्टिंग, लॉन टेनिस, मल्लखांब, तलवारबाजी, कुस्ती आणि जलतरण या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
दोन वेळेस महाराष्ट्र संघ अजिंक्य
आतापर्यंत दोन वेळेस महाराष्ट्राने २०० पेक्षा अधिक पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र संघाचे लक्ष्य आता या स्पर्धेत पदकांचे त्रि शतक साजरे करण्यावर असेल. महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धांमधील कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे. गुणवंत युवा खेळाडूंनी २०१९ आणि २०२० मध्ये महाराष्ट्राला अजिंक्यपदाचा बहुमान मिळवून दिला आहे. २०२० मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र संघाने विक्रमी २५६ पदकांची कमाई केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या संघाने ७८ सुवर्ण पदके पटकावली होती. २०१९ मध्ये पुणे येथील स्पर्धेत महाराष्ट्र संघ २२८ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला होता.