शबनम न्युज | पिंपरी
ताथवडे गावठाण येथील सर्वे क्रमांक १७४/७५ मध्ये एक धार्मिक स्थळ आहे. ताथवडेकरांसह पंचक्रोशीतील नागरिकांची येथे मोठी श्रद्धा असून याठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. मात्र, या धार्मिक स्थळाशेजारील जागा अंत्यविधीसाठी आरक्षित करण्यात आली आहे. ताथवडे परिसरात अन्य ठिकाणी मुबलक जागा उपलब्ध असून हे आरक्षण स्थलांतरित करण्यात यावे. तसेच मागील कित्येक वषार्पासून रखडलेले प्रश्न सोडवावेत. असे साकडे ताथवडेकरांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे.
ग्रामस्थांच्या मागणीवर ठोस निर्णय व्हावा, यासाठी भाजपाचे युवा नेते चेतन पवार यांनी भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सर्वे क्रमांक १७४/७५ मध्ये रहिवासी क्षेत्र आहे. आजूबाजूला लहान मुलांच्या शाळा, क्रीडांगण आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मृतावर अंत्यसंस्कार करणे संयुक्तिक ठरणार नसल्याचे चेतन पवार यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न कायम
सन २००९ मध्ये ताथवडे गावचा समावेश महापालिकेत करण्यात आला. मात्र, येथील जिल्हा परिषदेचे शाळेचे अद्याप हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी महापालिकेच्या हद्दीत राहत असूनही त्यांना महापालिकेच्या सुविधा मिळत नाहीत. येथील शाळेचे हस्तांतरण करण्यासाठी यापूर्वी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यावर तोडगा निघत नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे पवार यांनी सांगितले.