शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची हालचाल आता मतदारसंघात वाढली आहे. 31 जानेवारीपासून 7 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत, याकरिता इच्छुक उमेदवार आपापले अर्ज घेत असून दाखल करत आहेत. आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. महत्त्वाचे म्हणजे अजूनही राष्ट्रवादीवतीने उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तरीही नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज घेतला यामागे त्यांना कारण विचारले असता, त्यांनी सांगितले कि, “इच्छुक उमेदवार हा निवडून जाहीर झाल्यापासूनच मतदारसंघात आपल्या मतदारांच्या भेटीगाठी घेत असतो, निवडणुकीची तयारी करत असतो, पक्षाची बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याचा निर्णयही होणार असल्याने आपण निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज घेतला” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाना काटे यांनी 2014 मध्ये चिंचवड विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना 42,553 मते मिळाली होती व ते तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते. चिंचवड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला होता. शरद पवार ,जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडण्यात आला होता. चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरू होती. त्यात नाना काटे यांचे नाव प्रथम क्रमांकावर चर्चेला आले आहे. मात्र, राष्ट्रवादीने अजूनही पोटनिवडणुकीबाबत आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.