शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी घोषित केली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप किंवा अश्विनी जगताप या दोघांमधून भाजप कोणाला उमेदवारी घोषित करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, अश्विनी जगताप आणि शंकर जगताप दोघांनी ही उमेदवारी अर्ज घेतले होते. परंतु भाजपने उमेदवार घोषित केले नसल्याने दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आज भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवार घोषित केले. यांनतर शंकर जगताप यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“पक्षाने वहिनी साहेबांना उमेदवारी दिल्याने मला आनंद झाला आहे. मी वहिनींच्या विजयासाठी मनापासून काम करीन,” अशी प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी व्यक्त केली. कोणाला उमेदवारी द्यावी यावरून कुटुंबात मतभेद आहेत का? असे विचारले असता, ते म्हणाले, “हे सर्व अनुमान होते, आमच्या कुटुंबात तेढ नाही, वहिनींच्या विजयासाठी मी मनापासून काम करेन,” असे शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी त्यांनी पक्षाच्या निर्णयाचे पालन करणार असल्याचे या पत्रकात सांगितले होते.
यावेळी शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे म्हणाले कि, “कोणाला उमेदवारी द्यायची यावरून कुटुंबात कोणतेही मतभेद नसल्याची आमची भूमिका होती, आणि ते बरोबर सिद्धही झाले आहे. अश्विनी जगताप यांच्या प्रचार व्यवस्थापकपदी शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.”