शबनम न्युज | चिंचवड
शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात आज मंगळवारी (दि.७) रोजी दाखल केला. यावेळी माजी नगरसेवक अमित गावडे, नवनाथ जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर २६ फेब्रुवारीला पोट निवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक विभागाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आज अखेरचा दिवस आहे.
माध्यमांशी संवाद साधताना राहुल कलाटे म्हणाले, “२००९ पासून चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस चालत नाही. त्यामुळेच लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मी सुद्धा मागील वेळेस अपक्ष निवडणूक लढविली होती. अजितदादांना आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहर कळले नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणीही लढायला तयार नव्हते. लोकसभेची लाट आल्यानंतर हे सगळे उमेदवार, जे आता तथाकथित पुढे आले ते सगळे घरी गेले होते. ज्यावेळेस मी निवडणूक लढायची ठरवली, तेव्हा बाकीच्या पक्षांनी आणि संघटनांनी मला त्यावेळी साथ दिली होती.” असेही ते म्हणाले.