शबनम न्युज | चिंचवड
आज चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरिता शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “माझ्याबरोबर शिवसैनिक आहेत, मी महापालिकेत शिवसेनेचा गटनेता म्हणून काम करतो आहे आणि मी शिवसेनचा नगरेसवक आहे. परंतु मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती. मला असं वाटत होतं की महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी विचार केला जाईल. कारण, २०१९ मध्ये मी शिवसेना बंडखोर म्हणून अपक्ष निवडणूक लढवली होती. मला चिंचवडच्या जनतेने भरभरून प्रेम दिलं होतं. मला १ लाख १२ हजारांच्या वर मतं दिली होती. तो एक माझ्यावर दाखवलेला खूप मोठा विश्वास होता.” असे कलाटे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. २६ फेब्रुवारी रोजी या जागेसाठी निवडणूक होणार आहे.