शबनम न्यूज पुणे प्रतिनिधी
पावसाळ्याच्या आधी नाले सफाई आणि पावसाळी ड्रेनेज सफाई ह्या अत्यंत महत्वाच्या कामात मनपा प्रशासना कडून दरवर्षी अक्षम्य हलगर्जीपणा होतो आणि त्याची शिक्षा सर्व पुणेकरांना भोगावी लागते. ह्या वर्षी देखील पुणे शहरातील अनेक नाले अजूनही साफ केले नाहीत. तसेच अनेक ठिकाणी होणाऱ्या पणी तुंबण्याच्या घटना दर पावसाळ्यात घडतात.
ह्या सर्व अत्यंत तातडीच्या आणि आवश्यक कामांसंदर्भात भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने पुणे मनपा आयुक्त श्री विक्रमकुमार यांची भेट घेतली. सदर कामे अत्यंत युद्धापातळीवर पूर्ण करून घ्यावीत. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य पद्धतीने काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावे असे श्री जगदीश मुळीक यांनी मा. आयुक्तांना सांगितले.
सदर कामांसाठी तसेच पावसाळ्यात अचानक उद्भवणाऱ्या समस्यांसाठी एक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल असे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले. सर्व नाला सफाई २० जून पर्यन्त पूर्ण होईल आणि ३० मे नंतर कोणतेही खोदाई काम करण्यात येणार नाही असे आश्वासन त्यांनी जगदीश मुळीक आणि शिष्टमंडळाला दिले.
पुण्यातील नागरिकांना पावसाळ्यातील ह्या दरवर्षी उद्भवणाऱ्या समस्यांचे कालबद्ध रीतीने निराकरण व्हावे यासाठी पावसाळी ड्रेनेजची कामे पूर्ण केली पाहिजेत. तसेच नाले स्वच्छ राहण्यासाठी आवश्यक ती उपाय योजना केली पाहिजे असे यावेळी जगदीश मुळीक यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापुसाहेब पठारे, धीरज घाटे, सरचिटणीस दिपक पोटे, दात्तभाऊ खाडे, माजी नगरसेवक महेश वाबळे, प्रमोद कोंढरे , संतोष खांदवे, हेमंत लेले ,पुष्कर तुळजापूरकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.