भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
– नियोजन करण्याबाबत नगरसेवकांशी झूम मिटिंगद्वारे संवाद
पिंपरी । प्रतिनिधी
मी एक दिवा…तू एक दिवा… हरवूया अंधाराला..! अशा भूमिकेतून आपण सर्वजण कोविड-१९ च्या महामारीच्या काळात गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रीय आहोत. कोविडमुळे सर्वजण वाईट अवस्थेतून जात आहेत. संकटरूपी हा अंधार आपण प्रयत्न करून दुर करू. नागरिकांना पुन्हा सुदृढ आरोग्यरूपी प्रकाश निर्माण करण्यासाठी भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये प्रतिदिन १० हजार कोविड-१९ लसीकरण मोहीमेचे आयोजन केले आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये लसीकरण मोहीम राबवण्यासाठी ‘झुम मिटिंग’द्वारे आमदार लांडगे यांनी नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधला.
महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, ई, फ आणि क क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी तसेच भोसरी मतदारसंघातील नगरसेवक पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.
आमदार लांडगे म्हणाले की, लोकांना कोविडच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जनजागृती, अन्नधान्य वाटप, रुग्णांच्या नातेवाईकांना मदत, सॅनिटाईझर- मास्क वाटप, कम्युनिटी किचन आदी विविध उपक्रमांतून आपण नागरिकांना सर्वोतोपरी मदत केली आहे. ‘लॉकडाउन- १ मध्ये आपण सर्वजन होरपळून निघालो आहोत. आता प्रशासनाने पुन्हा लॉकडॉन-२ ची अंमलबजावणी केली आहे. पुन्हा आपण सर्वजन दूष्टचक्रात अडकलो आहोत. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण मोहीम आपण राबवत आहोत. कोविड-१९ हेल्पडेक्स आपण सुरू केला. त्याद्वारे लोकांना बेड, आयसीयू, ऑक्सिजन व्हँटिलेटर, रेमडिसिवर इंजक्शन, प्लाझ्मासाठी किती कसरत करावी लागते? याचा विचारसुद्धा चिंता देणारा आहे. आपल्याला लसीकरण वाढवले पाहिजे. यासाठीच आपण विधानसभा मतदार संघामध्ये प्रतिदिन १० हजार कोविड-१९ लसीकरण मोहीम यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे.
या वेळी नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे आमदार लांडगे यांनी निरसन केले. तसेच काही अडचण आल्यास मदत करू, असे आश्वासनही दिले.
*
लसीकरणाबाबत नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना सूचना…
आमदार लांडगे यांनी नगरसेवकांना सूचना केल्या. या मध्ये प्रत्येक नगरसेवकाने प्रभागात किमान ४ बॅनर लावावेत (लसीकरण सेंटर च्या आजूबाजूला लावणे आवश्यक आहे). प्रत्येक नगरसेवकांनी किमान 200 जणाचे लसीकरण प्रतिदिन करून घेणे. ज्याचे लसीकरण करायचे आहे. त्या व्यक्तीची संपूर्ण महिती घेऊन एक एक्सेल शीट तयार करावी (एकूण200). एक्सेल शीट तयार करून 200 लोकांची माहिती लसीकरनाच्या आगोदरच्या दिवशी केंद्रावर द्यावी लागेल. नगरसेवकांनी या कामासाठी आपल्या कार्यालयातील 1 माणूस देणे. क्षेत्रीय प्रभागात रोज किमान ३ हजार ५०० जणांचे लसीकरण झाले पाहिजे. (एकूण ८००). विधानसभेचे रोजचे 10 हजार टार्गेट असेल आणि सेंटर वाढल्यानतर टार्गेट वाढू शकेल. लसीकरण केंद्र ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था नगरसेवकांनी करावी. आमदार कार्यालयातून हे काम पाहण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एक प्रमुख असेल.
*
जनजागृती करणे महत्त्वाचे : विकास ढाकणे
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले की, क, ई व फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे. लसीकरण संख्या वाढणे गरजेचे आहे. महापालिकेकडून नागरिकांना वाहन व इतर सुविधा दिल्या आहेत. झोपडपट्टी व उच्चभ्रु सोसायटीमध्ये लसीकरण बाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे ढाकणे म्हणाले. रेमडिसिव्हर इंजेक्शनची मागणी केली असून त्याचा साठा उपलब्ध होईल. तसेच लसीकरणबाबत आरोग्य विभागाच्या सूचना आल्यानंतर आणखी पुढे कार्यवाही करू, असे आश्वासन ढाकणे यांनी केले.
*
प्लाझ्मा दान करण्यासाठी जनजागृती करा : आमदार लांडगे
प्लाझ्मा दान करा…एक जीव वाचवा’ या मोहीमेद्वारे आपण शेकडो लोकांना मदतीचा हात दिला आहे. मात्र अजुनही प्लाझ्मा दान करणारे कमी आहेत. त्यासाठी प्रयत्न करावे. त्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले.
**
पिंपरी- चिंचवड आपला स्वाभिमान; हेवेदावे विसरून एकत्र या..!
पिंपरी- चिंचवड शहर आपले आहे. नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे. शहराचे विश्वस्त आहोत आपण. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आपली आहे. लोकांनी ज्या विश्वासाने निवडून दिले, त्याच विश्वासाने लोकांच्या सुरक्षेसाठी आपण झटले पाहिजे. पिंपरी- चिंचवड हा आपला स्वाभिमान आहे. शहरातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून लसीकरण मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.