शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी, ०९ एप्रिल २०२१:- कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील बेड मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे असे मत केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा दिल्ली येथील सफदरजंग मेडिकल कॉलेजचे निदेशक प्रा. डॉ. जुगल किशोर यांनी व्यक्त केले.
शहरातील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्र सरकारच्या द्वीसदस्यीय पथकाने पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली. दिल्ली येथील लेडी हार्डिंगे मेडिकल कॉलेजचे प्रा.डॉ. घनश्याम पतके यांचा या पथकात समावेश होता. अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटल, महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये तयार करण्यात आलेली वॉररूम तसेच मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील आरटीपीसीआर चाचणी केंद्राला पथकाने भेट देऊन पाहणी केली. आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत चर्चा करून मनपाच्या वतीने कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांची तसेच कोरोना रुग्णवाढीचा दर, मनपाच्या वतीने करण्यात येणारे बेड मॅनेजमेंट, उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर आदीबाबत माहिती घेतली. यानंतर प्रा. डॉ. जुगल किशोर आणि प्रा. डॉ. घनश्याम पतके यांनी विविध सूचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वॉररुमचे समन्वयक डॉ. क्रिस्टोफर झेव्हियर सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, जम्बो कोवीड हॉस्पीटलचे समन्वयक डॉ. सुनिल पवार आदी उपस्थित होते.