शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि उपलब्ध बेडच्या संख्येमध्ये खूप मोठी तफावत निर्माण होत आहे. विशेषतः गंभीर रुग्णांसाठी लागणाऱ्या आयसीयू बेडची कमतरता चिंता वाढवणारी आहे. अशा परिस्थितीत भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे हे महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात आयसीयू विभाग (अतिदक्षता विभाग) सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अखेर भोसरी रुग्णालयात १० बेडचा आयसीयू विभाग तयार केला आहे. तसेच या विभागाच्या शेजारीच आणखी १० बेड उपलब्ध केले जाणार आहेत. नगरसेवक रवि लांडगे यांनी सोमवारी (दि. १२) रुग्णालयात जाऊन कामाची पाहणी केली. बेडसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून ते रुग्णांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत आणि कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे जीव वाचवावेत, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे.
महापालिकेने भोसरी येथे रुग्णालय उभारले आहे. तीन-चार वर्षे होत आले तरी श्रीमंत महापालिकेला या रुग्णालयात आयसीयू विभाग सुरू करण्याचे शहाणपण सुचले नाही. उलट रुग्णालयाचे खासगीकरण करून रुग्णांची लूट करणाऱ्या टोळीला देण्याचा घाट घालण्यात आला होता. परंतु, भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी भोसरी आणि आसपासच्या भागातील गोरगरीब रुग्णांचा विचार करून भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध केला होता. तसेच रुग्णालय खासगीकरणाविरोधात भोसरीकरांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहनही केले होते. त्याला प्रतिसाद देत हजारो भोसरीकर रस्त्यावर उतरले आणि भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडला. भोसरीकरांच्या एकतेमुळे गोरगरीबांना कमी खर्चात चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांच्या पैशांतून उभारण्यात आलेले भोसरी रुग्णालय महापालिकेच्याच ताब्यात राहिले आहे.
गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. त्यावेळी कोविड केअर सेंटरच्या नावाखाली महापालिकेने कोट्यवधी रुपये उधळले. इतर कामांसाठी कोट्यवधींचा वाढीव खर्च मंजूर करण्यात आला. परंतु, भोसरी रुग्णालयात एक सुसज्ज आयसीयू विभाग सुरू करून ते गोरगरीब रुग्णांना उपलब्ध करून द्यावे, असे वाटले नाही. गेल्या वर्षी भोसरी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची सर्वात जास्त गरज असतानाही भोसरी रुग्णलयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी भोसरी रुग्णालयात जाऊन सर्व रुग्णालयाचाच आढावा घेतला. या रुग्णालयात आयसीयू विभाग अत्यंत गरजेचा असल्याचे त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरात कोरोनाने पुन्हा एकदा उग्र रुप धारण करण्यास सुरूवात केल्यामुळे भोसरी रुग्णालयात आयसीयू विभाग तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली होती.
एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर भोसरी रुग्णालयात आयसीयू विभागा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने भोसरी रुग्णालयात १० बेडचा आयसीयू विभाग तयार केला आहे. त्याचे काम पूर्णत्वास येत आहे. तसेच आयसीयू विभागाच्या बाहेरच मोठी जागा असल्याने तेथे आणखी १० बेड उपलब्ध केले जाणार आहेत. बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी सोमवारी भोसरी रुग्णालयात जाऊन आयसीयू विभागाची आणि तेथील उपलब्ध केलेल्या बेडची पाहणी केली. या बेडसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून काही रुग्णांचा जीव वाचवणे शक्य होईल, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. त्यामुळे भोसरी रुग्णालयातील आयसीयू विभाग लवकर कार्यान्वित होऊन तो गंभीर रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे.