कोल्ड स्टोरेजची संख्या वाढवा
शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. दिवसाला 25 ते 30 जणांचे मृत्यू होत आहे. वाढलेली मृत्यू संख्या चिंताजनक आहे. प्रत्येकाचा जीव महत्वाचा असून मृत्यू रोखण्यासाठी, मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच शहरामध्ये कोल्ड स्टोरेजची संख्या कमी पडत असून त्यामध्ये वाढ करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
खासदार बारणे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पाठविले आहे. शहरातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे महापालिकेच्या विद्युत दाहिनीमध्ये अंत्यविधीसाठी वेळ लागत आहे. याकरीता कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांचा अंत्यविधी करण्यासाठी स्माशानभूमीमध्ये इतर व्यवस्था करू शकतो का ? याबाबत विचार करावा. सध्या शहरामध्ये कोल्ड स्टोरेजची संख्या कमी पडत आहे. अधिकचे स्टोरेजची व्यवस्था करण्याबाबत विचार करण्यात यावा.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. दरररोज तीन हजाराच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत. सध्या महापालिका व खासगी रूग्णालयात रूग्णांना खाटाची उपलब्धता नाही. त्यातच ऑक्सिजन व व्हेंटेलेटरच्या खाटा मर्यादित आहेत. त्यामुळे अधिकच्या खाटा उपलब्ध करून देण्यासाठी महापलिकेने व्यवस्था करावी. तसेच खासगी रूग्णालय ताब्यात घेवून खाटांची संख्या वाढवावी. एकदरीत पिंपरी-चिंचवड शहराची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत. उपाययोजना कराव्यात, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.
आवश्यकता असलेल्या रुग्णांलाच रेमडिसिवीर इंजेक्शन द्यावे!
रेमडिसिवीर इंजेक्शनची आवश्यकता नसतानाही डॉक्टर रुग्णाला इंजेक्शन देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तरच रुग्णांला रेमडिसिवीर इंजेक्शन द्यावे. तशा सूचना जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना द्याव्यात, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून जिल्ह्यातील डॉक्टरांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.