पिंपरी,( प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन दि.११ ते १४ एप्रिल २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. महोत्सवात अनेक कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारधारा मांडली.
रविवारी दि.११ एप्रिल रोजी शाहीर सुरेश सूर्यवंशी यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील विविध प्रसंग उभे केले. त्यानंतर संगीत विशारद प्रज्ञा इंगळे यांनी गीत गायन केले. सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत गायन सादर करून त्यांनी विविध सामाजिक विषय हाताळले. यामध्ये महिला सक्षमीकरण स्त्री शिक्षण तसेच विषमतेवर आधारित असलेल्या अनिष्ठ रूढी परंपरा यावर भाष्य करणाऱ्या विषयांचा समावेश होता. संकल्प गोळे यांच्या संकल्प भिमरायाचा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. गीतगायनाच्या कार्यक्रमानंतर आदर्श क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हा सांस्कृतिक नृत्य तसेच एकपात्री नाट्यप्रयोगावर आधारित असलेला कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर आधारित गीत गायन तसेच नृत्याविष्कार सादर करण्यात आला.
सोमवार दि.१२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता स्थानिक कलावंतांचा गीत गायनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये मारुती जकाते, बापू माने, प्रशांत माघाडे, बाळ बनसोडे, वैशाली नगराळे, सुरेश कल्लाळेकर, निहाल लगाडे, माणिक कांबळे गुंडुराज कांबळे, कैलास शिंदे आदींनी सहभाग घेतला होता. यानंतर स्वरांगण दृष्टिहीन संस्था चिंचवड यांचा गीतगायनाचा कार्यक्रम झाला. कव्वाल सुलतान नाझा यांनी भारतीय संविधान तसेच चवदार तळ्याचा सत्याग्रह या विषयावरील गीते सादर केली . धिरज वानखेडे, सरवर जानी यांनी भिमगीते सादर केली. सुरेश कांबळे आणि सहकाऱ्यांनी प्रबोधनात्मक गीते सादर केली. सुरेश कांबळे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली छक्कड सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. मंजुषा शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणाचा संघर्ष आपल्या गीतातून मांडला. तर साधना मेश्राम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीवर गीत सादर करून लक्ष वेधले.
महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज www.facebook.com/pcmcindia.gov.in
आणि pcmcindia या युट्युब चॅनेलवरून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जात असून नागरिकांनी हे कार्यक्रम घरबसल्या आवर्जून पहावे असे आवाहन करण्यात येत आहे.