शबनम न्युज / तळेगाव दाभाडे
तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात केंद्र येथील कोविड केअर सेंटर येथे काल (दि.१२) मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली. व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधला.तसेच कोविड केअर सेंटर मधील आरोग्य सुविधा व इतर सोईसुविधांबाबत माहिती घेतली. कोरोना बाधित रुग्णांवर कमी वेळात योग्य उपचार करून लवकर कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. रुग्णांचे मानसिक आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी काळजी घ्यावी. नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.अशा सुचना आमदार सुनील शेळके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच नवीन काही उपाययोजना करता येतील का याचा आढावा हि यावेळी सुनील शेळके यांनी घेतला.
यावेळी सुनील शेळके म्हणाले कि, मावळ तालुक्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहोत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य प्रशासनासह योग्य पाऊले उचलत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आपण करीत आहोत. नागरिकांनीही शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. व आपला तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी यावेळी नागरिकांना केले.
यावेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत व इतर अधिकारी उपस्थित होते.