पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. मंदिर उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने निधी संकलन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांचे बंधू व उद्योजक विजय जगताप यांच्या वतीने चंद्ररंग ग्रुपचे संचालक शंकर जगताप यांनी राम मंदिर उभारणीसाठी ११ लाखांचा निधी दिला आहे.
चंद्ररंग ग्रुपचे संचालक शंकर जगताप यांनी बुधवारी (दि. १४) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहसंपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे यांच्याकडे ११ लाखांचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी प्रसेन अष्टेकर, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊलीशेठ जगताप, मिलिंद कंक आदी उपस्थित होते.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद राम मंदिरासाठी देशभर निधी गोळा करत आहे. त्यासाठी राम मंदिर निर्माण सहयोग अभियान (मदतीची मोहीम) सुरू आहे. या अभियानाद्वारे देशभरातील ५ लाख कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्व कुटुंबाकडून राम मंदिर उभारणीसाठी निधी उभा करण्यात येणार आहे.
आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांचे बंधू उद्योजक विजय जगताप व शंकर जगताप यांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी स्वतःचे योगदान दिले आहे. जगभरातील सकल हिंदू समाजाचे स्वप्न असलेल्या राम मंदिर उभारण्याच्या या पवित्र कार्यात आमच्या कुटुंबाला खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाल्याची भावना आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केली.