- वैद्यकीय सेवा सुरळीत द्या, अन्यथा शिवसेना आंदोलन करणार – ॲड. सचिन भोसले
- कोरोना बाधितांच्या जीविताचे रक्षण करा; दोनशे व्हेंन्टीलेटर खरेदी करा
शबनम न्युज / पिंपरी
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येपुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हतबल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय विभागाचा आणि प्रशासनाचा गलथान कारभार त्यामुळे उघडकीस आला आहे. रुग्णांची रोज वाढत जाणारी संख्या पाहता आयुक्तांनी आपल्या अधिकारात एकदम दोनशे ते तीनशे व्हेंन्टीलेटर खरेदी करावेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील सर्व पुरवठा आयुक्तांनी स्वता:च्या नियंत्रणात घ्यावा आणि कोरोना बाधितांच्या जीविताचे रक्षण करावे. वैद्यकीय सेवा सुरळीत करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करु. असा इशारा शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिला आहे.
गुरुवारी (दि. 15 एप्रिल) ॲड. भोसले यांनी आयुक्त पाटील यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिले. या पत्रात ॲड. भोसले यांनी म्हटले की, मार्च 2020 पासून शहरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीला शंभर ते दोनशे अशी मर्यादित असणारी रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली. परंतू माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहिर केल्यामुळे रुग्णवाढ नियंत्रणात आली. यानंतर वर्षभरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वैद्यकीय विभागासाठी पुढील गरज व कोरोनाची येणारी दुसरी लाट विचारात घेऊन पायाभूत सेवा सुविधा उभारायला हव्या होत्या. परंतू तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि मनपा पदाधिका-यांना देखिल यांचे गांभिर्य लक्षात आले नाही. शहरातील कोरोना रुग्ण वाढीचा आकडा रोजच वाढत आहे. मनपाचे सर्व हॉस्पिटल आणि खाजगी सर्व हॉस्पिटल मध्ये ऑक्सीजन आणि व्हेंन्टीलेटर बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे रोजच मृत्यूचा आकडा देखिल वाढत आहे. अनेक रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरत असताना शहरातील सर्व मेडीकल व हॉस्पिटलमध्ये या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी याचा काळाबाजार सुरु आहे. शहरातील रुग्णांच्या गरजेच्या पन्नास टक्केच इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. मनपा प्रशासनाच्या आणि पदाधिका-यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे आजपर्यंत शहरातील 2249 नागरीकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. बुधवारी (दि. 14 एप्रिल) तर एका दिवसात 45 रुग्णांचा बळी या कोरोनाने घेतला आहे. हि आकडेवारी चिंताजनक असून शहराच्या नावलौकिकास काळीमा फासणारी आहे. या सर्व बाबींचा विचार करुन आयुक्त राजेश पाटील यांनी आपल्या अधिकारात एकदम 200 ते 300 व्हेंन्टीलेटरची खरेदी करावी आणि मनपाच्या भोसरी (नविन), जीजामाता, आकुर्डी, तालेरा, थेरगांव, सांगवी येथील रुग्णालयात आवश्यक तेवढ्या ऑक्सीजन बेडची आणि व्हेंन्टीलेटरची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा शहरातील सर्व पुरवठा आयुक्तांनी स्वता:च्या नियंत्रणात घ्यावा. शहरातील खासजी रुग्णालयातून कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी अवाजवी बील आकारणी केली जाते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आयुक्तांनी या रुग्णालयांचे भरारी पथकाव्दारे लेखा परिक्षण करावे आणि या भरारी पथकाने आजारातून बरे झालेल्या किमान पाच ते दहा टक्के रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या बिलांबाबत माहिती घ्यावी. मनपाच्या सर्व रुग्णालयातील सेवा, सुविधा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा शिवसेना आंदोलन करेल अशा इशारा पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी आयुक्तांना दिला आहे.