महाविकास आघाडी सरकारबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस झाली सतर्क
शबनम न्युज / पिंपरी-चिंचवड
कोरोना संक्रमणाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यांना या संकटातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार न थकता, न मागे हटता आहोरात्र प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः अधिका-यांच्या भेटीगाठी घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योगदान देत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार अपेक्षित सहकार्य करत नसले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार हातबल न होता परिस्थितीवर धाडसाने मात करीत आहे. या भयंकर संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार, पार्थ दादा पवार युवा मंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबध्द आहे. नागरिकांनी धीर धरावा, आपल्याला आपेक्षित सर्व मदत उपलब्ध करण्यासाठी केव्हाही संपर्क साधावा. कारण, “जोपर्यंत कोरोनाला हरवत नाही, तोपर्यंत लढत राहणार, असा निर्धार भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे.
जगभरात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. राज्यातील विशेषतः पिंपरी-चिंचवडमधील परिस्थितीने विदारक रुप धारण केले आहे. दिवसाला पन्नासहून अधिक लोकांचे प्राण जात आहेत. हजारो नागरिक बाधित होत आहेत. त्यांना कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी धीर देण्याची गरज आहे. रुग्णांना उपचार देण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी हतबल झाले आहेत. सर सलामत तो पगडी पचास अशी चमडी बचाव भूमिका घेऊन सत्ताधारी कोरोनाबाधित रुग्णांप्रती सतर्कता दाखवत असल्याचा आव आणत आहेत. तसेच, समुद्रात सागरी लाटांच्या मा-याने जहाज बुडत असल्याचा अंदाज येताच उंदरांची पळापळ सुरू होते. कॅप्टन मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जहाज वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत असतो. कोरोनाच्या परिस्थितीत पालिकेतील सत्ताधा-यांची देखील अशीच अवस्था झाली आहे. पालिकेतील सत्ताधारी मंडळी मैदान सोडून पळ काढू लागली आहेत. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा आता रामभरोसे राहिली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार व पार्थ दादा पवार युवा मंचच्या माध्यमातून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी रणांगणात जोरदार शड्डू ठोकला आहे.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून पिंपरी-चिंचवडमध्ये जम्बो कोविड सेंटर सुरू केले. त्याठिकाणी हजारो रुग्णांना उपचार दिले जातात. अशातच आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. इंजेक्शन आणि लस पुरवठा केंद्र सरकारच्या नियंत्रणात असल्यामुळे ते वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे असंख्य रुग्णांना वेठीस धरले जात आहे. रुग्णांचे प्राण जात असताना पालिकेतील सत्ताधा-यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीचा प्रस्ताव जाणिवपूर्वक तहकूब ठेवला आहे. ज्यांना आवश्यकता आहे, अशा रुग्णांना पालिका प्रशासनाकडून इंजेक्शन दिले जात नाही. काही अधिकारी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करण्यात गुंतले आहेत. सत्ताधा-यांचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे त्यांच्यावर हतबल होण्याची वेळ आली आहे. त्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.
पालिका प्रशासन आणि सत्ताधारी हतबल झाले असले तरी आम्ही अजून रणांगण सोडले नाही. राज्यातील महाविकास अघाडी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णांची काळजी घेतली जात आहे. पार्थ दादा पवार युवा मंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी आहोरात्र काम सुरू आहे. नागरिकांना वाचवणे हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून प्रशासन यंत्रणा कार्यरत केली आहे. पुणेसह पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाच्या परिस्थितीचा दैनंदीन आढावा अजितदादा घेत आहेत. मृत्युचा आकडा लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याच्या सूचना त्यांनी पालिकेच्या अधिका-यांना दिल्या आहेत. अजितदादा वरीष्ठ पातळीवर प्रयत्न करत असताना राष्ट्रवादीच्या टिममधील प्रत्येक कार्यकर्ता सतर्क आहे. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने 15 दिवसांसाठी कडक निर्बंध घातले आहेत. त्याला पिंपरी-चिंचवडकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक आणि नागरिकांनी सुध्दा राज्य सरकारचे नियम पाळत सहकार्याची भूमिका ठेवली आहे, असेही लांडे यांनी म्हटले आहे.
कोरोनाशी खूनगाठ बांधुनच रणांगणात झुंज देण्याची तयारी ठेवली आहे. कारण, सत्ताधा-यांनी “बचेंगे तो, और भी लडेंगे” अशी बचावात्मक भूमिका घेऊन नागरिकांना रामभरोसे सोडले आहे. आम्ही त्यांना एकटे पडू देणार नाही. प्रत्येक रुग्णासोबत राष्ट्रावादीचा कार्यकर्ता सक्षमपणे उभा आहे. संकटकाळात परिस्थितीवर निर्धाराने कशी मात करायची, याचा धडा आम्ही शरद पवार साहेबांकडून शिकलो आहोत. 1993 किल्लारी भुकंपाच्या घटनेनंतर नागरिकांचे जीव वाचवण्याला त्यांनी प्राधान्य दिले. प्रत्यक्ष स्थळी जाऊन लष्कराच्या मदतीने त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. येवढेच नाही तर भूकंपाने पडझड झालेली घरे पुन्हा बांधून दिली. समुद्र किनारपट्टीवर त्सुनामी आल्यानंतर अनेकांचे प्राण गेले. त्या परिस्थितीत देखील पवार साहेबांनी तेथील सरकारला मदत केली. सध्याच्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत देखील पवारसाहेब आहोरात्र काम करत आहेत. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रडत बसण्यापेक्षा लढून परिस्थितीवर मात करण्याची शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. तोच धडा घेऊन जोपर्यंत कोरोनाशी लढाई संपत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीतील नेते , कार्यकर्ते रणांगण सोडणार नाही, असा निर्धार माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला.