शबनम न्यूज / पिंपरी
महापालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रांवर आता एन.सी.सी.चे कॅडेट महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करणार आहेत. यासाठी पुणे येथील एन.सी.सी. ग्रुप हेडक्वार्टरकडून सुमारे १०० एन.सी.सी. कॅडेट स्वयंसेवक आणि १४ प्रशिक्षक आपली सेवा देणार आहेत, अशी माहिती मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे यांनी दिली.
महापालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रांवर नागरिकांची वाढती संख्या पाहता तसेच कोरोना संबंधित नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली. महापालिका आणि एन.सी.सी. ग्रुप हेडक्वार्टर या दोन संस्थांमध्ये सुरक्षा यंत्रणेतील सहकार्याबाबत चर्चा झाली. आयुक्त राजेश पाटील, आयुक्त विकास ढाकणे, भारतीय सेनेचे अधिकारी ब्रिगेडियर सुनिल लिमये आणि कर्नल विनायक चव्हाण यांच्या पुढाकाराने एन.सी.सी.योगदान या संकल्पनेतून महापालिकेकरिता एन.सी.सी. कॅडेट स्वयंसेवक नियुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका परिसरामध्ये कार्यान्वित असणा-या कोविड लसीकरण केंद्रांवर प्रथमच अशा प्रकारची नियुक्ती करण्यात आली आहे. याकामी महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे
यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या एन.सी.सी. कॅडेट स्वयंसेवक आणि प्रशिक्षकांना कोविड लसीकरण केंद्रांवर ने-आण करण्यासाठी पीएमपीएमएलच्या स्वतंत्र बसेसची व्यवस्था महापालिकेने केली आहे. तसेच नियुक्त करण्यात आलेल्या कॅडेट स्वयंसेवक आणि प्रशिक्षक यांना महापालिकेच्या वतीने कोविड सुरक्षा विषयक सामुग्री पुरविण्यात येणार आहे.