शबनम न्यूज / पिंपरी
मावळ तालुक्यांतील परदंवडी,धामणे,चांदखेड,पाचाणे या गावांच्या हद्दीमधून जाणाऱ्या बाह्यवळण रस्ता(रिंगरोड) बाबत बाधित शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही करावी. त्यांचे निराकरण करावे, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन सर्व समस्या मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन खासदार बारणे यांनी शेतकऱ्यांना दिले.
बाधित शेतकऱ्यांच्या या रस्त्याबाबत अनेक तक्रारी होत्या. खासदार श्रीरंग बारणे यांनी शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेतल्या. प्रांतअधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार मधूसुदन बर्गे, एमएसआरडीचे कार्यकारी अभियंता संदिप पाटील उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, मावळ तालुक्यांतील परदंवडी,धामणे,चांदखेड,पाचाणे या गावांच्या हद्दीमधून बाह्यवळण रस्ता(रिंग रोड)जातो. एमएसआरडीसीच्या माध्यमातून हा रस्ता करण्यात येणार आहे. येथील शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. जाणीवपूर्वक रस्ता स्थलांतर केला असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जागेवर जावून प्रत्यक्ष पाहणी करावी. शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घ्याव्यात. पीएमआरडीए आणि एमएसआरडीसीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करावे.