पिंपरी (दि. 22 एप्रिल 2021) कोरोना कोविड -19 ची दुसरी लाट पिंपरी चिंचवड शहरात वेगाने फोफावली आहे. पिंपरी चिंचवड मनपाची सर्व रुग्णालये आणि कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जम्बो कोविड रुग्णालय तसेच ऑटो क्लस्टर येथील स्पर्श कोविड रुग्णालयात हजारो रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. यापैकी आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथिल जम्बो कोविड रुग्णालयात आणि ऑटो क्लस्टर येथिल स्पर्श कोविड रुग्णालयात गुरुवारी (दि. 22 एप्रिल) महापौर माई ढोरे आणि स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके यांनी अचानक पाहणी करुन तेथिल रुग्णांशी संवाद साधला. यावेळी जम्बो रुग्णालयाचे डॉ. संग्राम कपाले, प्रिती व्हिक्टर आणि ऑटो क्लस्टर रुग्णालयाचे डॉ. अमोल होळकुंदे आदी उपस्थित होते. या पदाधिका-यांनी प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधला. तेथे मिळणा-या सेवा, सुविधांबाबत, स्वच्छतेबाबत, सुरक्षेबाबत माहिती घेतली. तसेच कामगारांबरोबर चर्चा केली त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, मंगळवार पासून सर्व रुग्णांना पौष्टिक आहार सकाळी, संध्याकाळी देण्यात येत आहे. याबाबतही अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त केले.