पुणे,दि. २३ : – पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्टयांमधील झोपडीधारक तसेच रहिवासी संघातील झोपडीधारकांना त्यांच्या पुनर्वसनाबाबत योग्य माहिती व मार्गदर्शन मिळावे. तसेच त्यांना सुयोग्य व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी व त्यांच्या योजना क्षेत्रावरील झोपडपट्टी पुनर्वसनाचे कामकाज जलद गतीने पुर्ण करण्यासाठी योजना क्षेत्रावरील झोपडीधारकांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदीनुसार सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी सहायक निबंधक सहकारी संस्था झोपुप्रा, पुणे यांच्यामार्फत सुलभ व जलदगतीने करण्याबाबतची कार्यवाही सुरु केलेली आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील झोपडीधारकांच्या सर्वांगीण उन्नतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या क्षेत्रातील झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्यास शासनाच्या मोफत सदनिका योजनेचा लाभ पात्र झोपडीधारकांना मिळणार आहे. संस्थेच्या नोंदणीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांमार्फत प्रमाणित लेखापरीक्षक संजय पडोळकर यांची नेमणुक करण्यात आलेली आहे.
झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणीमुळे संबंधित झोपडीधारकांना अनेक फायदे मिळू शकतील.— * नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातुन योजनेचे सर्व्हेक्षण, झोपडीधारकांची पात्रता निश्चीत करण्यासाठी लागणाऱ्या माहिती व कागदपत्रांचे सुलभ व जलद संकलन,*नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातुन पुनर्विकासाकरीता विकसक निवडण्याची संधी *झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रस्ताव दाखल करण्याची संधी *झोपडपट्टी पुनर्वसन योजनेकरीता झोपडीधारक व झोपुप्रा कार्यालय तसेच अन्य निगडीत शासकीय कार्यालये यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याकरीता झोपडीधारकांना कायदेशीर नोंदवलेली हक्काची संस्था उपलब्ध होणार *झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी ही पुर्णत : निशुल्क आहे. त्यासाठी झोपुप्रा, पुणे मार्फत प्रमाणिक लेखापरीक्षक संजय पडोळकर यांची नेमणुक करण्यात आलेली असुन त्यांच्याकडे संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व स्वाक्षरी केलेला विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक आहे.
संस्था नोंदणीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी तसेच संस्था नोंदणीबाबचे सर्व फायदे याबाबतची माहिती झोपडपट्टी पुनर्वस प्राधिकरण,पुणे च्या www.srapune.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्टयांमधील झोपडीधारक तसेच रहिवासी संघानी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या झोपडपट्टी क्षेत्रावर नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थ नोंदणी करण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी आवाहन केले आहे.