महापालिकेने ऑक्सीजन व्यवस्थापन पथक केले तयार ,
शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी, २३ एप्रिल २०२१ :- ऑक्सीजन पुरवठ्याचे वितरण, व्यवस्थापन, देखरेख, संचालन
जलद आणि कार्यक्षमरित्या करण्यासाठी महापालिकेने ऑक्सीजन व्यवस्थापन पथक तयार केले आहे.
२४ X ७ तासांकरीता हे पथक कार्यरत असेल. आयुक्त राजेश पाटील यांनी याकामी विविध समित्यांची
स्थापना केली आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत विविध
उपाययोजना महापालिकेने आखल्या आहेत. कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात
आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या रुग्णांवर उपचार करताना त्यांना आवश्यक असणारा ऑक्सिजन
पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी कार्यकारी अभियंता, उपअभियंता
यांच्यासह विविध अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती करुन वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली आहे.
ऑक्सिजन व्यवस्थापनासाठी ऑक्सिजन मॉनिटरींग कमिटीची स्थापन करण्यात आली असून
उपआयुक्त स्मिता झगडे यांच्याकडे या कमिटीचे नियंत्रण देण्यात आले आहे. महापालिकेच्या तसेच
खासगी कोरोना समर्पित रुग्णालये आणि हेल्थ सेंटर मध्ये आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा
सुरळीत व सुलभतेने होण्यासाठी तसेच याबाबत निर्माण होणा-या अडचणी सोडविणे आणि
उपाययोजना करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे आणि
सतिश इंगळे यांच्याकडे समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपअभियंता
मोहन खोंद्रे, कनिष्ठ अभियंता संदीप पाडवी, अमोल धडस, दिग्वीजय पवार, संभाजी गायकवाड,
चंद्रकांत गुंडाळ, प्रविण धुमाळ यांचा समावेश आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय, अन्य शासकीय
कार्यालय आणि ऑक्सिजन पुरवठाधारक यांच्याशी समन्वय साधण्याची जबाबदारी उपअभियंता
दिपक करपे, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांना जबाबदारी देण्यात आली
आहे.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात येणा-या ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये समन्वय
ठेवणे, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व सुलभतेने होण्यासाठी रात्रीच्या वेळी देखरेख ठेवण्यासाठी
२४ X ७ तासांकरीता ही यंत्रणा कार्यान्वित असणार आहे. यासाठी कोवीड १९ ऑक्सिजन मॉनीटरींग
टीम काम पाहणार आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, देवण्णा गट्टुवार या समितीमध्ये
असतील. हे अधिकारी पुणे विभागीय आयुक्तालयात रात्रीच्या वेळी ऑक्सिजन मॉनिटरींगचे काम
पाहणार आहेत.
कोवीड १९ अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत पिंपरी चिंचवड
महानगरपालिकेस उपलब्ध होणा-या ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन पुरवठा करणा-या वाहनांवर
दिवसा व रात्री २४ X ७ तासांकरीता देखरेख तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी ऑक्सिजन एस्कॉर्ट कमिटी
स्थापन करण्यात आलेली असून उपअभियंता सुनीलदत्त नरोटे, नितीन निंबाळकर, सुनील शिंदे
यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. या समितीच्या कामकाजासाठी पोलिस यंत्रणा देखील
सहाय्य करणार आहे.
ऑक्सिजन पुरवठ्याचे वितरण, व्यवस्थापन, देखरेख, संचालन व जलद आणि कार्यक्षमरित्या
निराकरण करणे, शहरातील छोट्या रुग्णालयांच्या ऑक्सिजन सिलेंडर संदर्भात तक्रारी घेणे, सिलेंडरचे
वितरण व व्यवस्थापन करणे, शहरातील लहान मोठया ऑक्सिजन पुरवठादारांशी समन्वय साधून
कामकाज करण्याकरिता कमिटी स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
महादेव बोत्रे, कुंडलिक आमले, फिजिओथेरफिस्ट कौस्तुभ लसूंते, सायकॅट्रीक सोशल वर्कर प्रकाश
जुकंटवार, कनिष्ठ अभियंता मोहन पोरे, प्रकाश कोतकर, बाळासाहेब शेटे, सुनील पवार, यांचा समावेश
आहे. ऑक्सिजन पुरवठयाचे वितरण, व्यवस्थापनावर देखरेख करण्यासाठी महापालिका मुख्य
प्रशासकीय इमारतीमधील वॉररुम मध्ये २४ X ७ तासांकरीता या नियंत्रण कक्षाचे काम चालणार
आहे.
महापालिकेची सर्व यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी युध्दपातळीवर कार्यरत
असुन नागरीकांनी कोरोना विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन महापालिकेस सहकार्य करावे
असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
जनता संपर्क अधिकारी