पुण्यात ‘कोरोना’मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढतेय, ही दिलासादायक बाब – उपमुख्यमंत्री अजित पवार
- ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील
- आरोग्य व्यवस्था अधिकाधिक सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील
- लसीकरणाला गती देण्यावर भर
शबनम न्यूज / पुणे
पुण्यात ‘कोरोना’ बाधित रुग्ण वाढत असले तरी देखील कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढत आहे, ही दिलासादायक बाब असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यातील विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री तथा आमदार चंद्रकांत पाटील, आमदार सर्वश्री सुनील टिंगरे, सुनील शेळके, अतुल बेनके, चेतन तुपे तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णांना ऑक्सिजन व रेमडेसीवीरची कमतरता भासू नये यासाठी रेमडेसीविर इंजेक्शन व ऑक्सिजनयुक्त बेडचा वापर आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य व्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्यावर भर द्या, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
कोरोना नियंत्रणासाठी तसेच वैद्यकीय सेवा सुविधा मिळवून देण्यासाठी डॉक्टरांबरोबरच सर्व अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत असल्याबद्दल सर्वांच्या कामाचे कौतुक करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरोग्य विषयक सेवा- सुविधांमध्ये वाढ करा. वैद्यकीय क्षेत्रातील उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा. डॉक्टरांच्या कामांच्या वेळेचे नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. गृह अलगीकरणातील रुग्णांकडून नियमांचे काटेकोर पालन होते का, याकडे लक्ष द्या. रेमडेसिविरच्या बाबतीत कडक धोरण राबवा, तसेच कोरोना लसीकरणाला गती देण्याची सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
कोरोनाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखतीचे व्हिडीओ सामाजिक माध्यमातून प्रसारित करा. यामुळे सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांचे देखील निरसन होईल,असे त्यांनी यावेळी सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. सद्यपरिस्थितीत शहरातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर युक्त बेडची गरज भासत आहे. येत्या काळात गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेडची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना नियंत्रण कामात दक्षता समित्यांची व एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यायला हवी. 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण 1 मे पासून करण्यात येणार असल्याने याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, जिल्ह्याला ऑक्सिजन व रेमडेसीवीरचा पुरवठा मागणीपेक्षा कमी प्रमाणात होत आहे. तरीदेखील जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी सुयोग्य नियोजन केल्याचे दिसून येत आहे. बेडची उपलब्धता कळण्यासाठी डॅशबोर्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, हॉस्पिटलच्या बिलांचे ऑडिट काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. रेमडेसीविरचा वापर हॉस्पिटल मध्ये दाखल असणाऱ्या आवश्यक त्या रुग्णांनाच करायला हवा.
डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, अन्य राज्यांतील कोरोना रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे येत्या काळात अन्य राज्यांतून पुरेसा ऑक्सिजन मिळण्यात अडचण भासू शकते. हे लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे, असे सांगून कोविड -19 च्या नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
डॉ. डी. बी.कदम म्हणाले, गृह विलगिकरणातील रुग्णांकडून डॉक्टरांनी सांगितलेले उपचार व सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. व या रुग्णांची तब्बेत बिघडत जाते. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या वापराबाबत डॉक्टरांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, जिल्ह्यात ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात वापर होण्यासाठी व ऑक्सिजन ची उपलब्धता वाढवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. श्री राव यांनी लसीकरण व्यवस्था, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णदर, मृत्यू दर, पुणे ग्रामीण भागातील रुग्णवाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, ऑक्सिजन व रेमडेसीवीर मागणी व सद्यस्थिती तसेच पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ऑक्सिजन, रेमडेसीविरची जिल्ह्याची मागणी व सुरळीत पुरवठा होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी डॉ. देशमुख यांनी दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.