- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची मागणी
- पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसारमाध्यांचे प्रतिनिधी आणि पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी २० ऑक्सिजन व १० व्हेंटिलेटर बेड कायम आरक्षित ठेवावेत, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देशात कोरोनाचे महासंकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत आपल्या शहरासह देशभरातील घडामोडी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. कर्तव्य बजावत असताना परिणामी, अनेक पत्रकार बांधवांना कोरोनाची बाधा झाली आहे.
ऑक्सीजन बेड आणि वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे दैनिक ‘प्रभात’ चे उपसंपादक श्रीकृष्ण पादीर यांच्या पत्नीचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे कोरोनामुळे निधन झाल्याची घटना ताजी आहे. तसेच, महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांची संख्या १०५ इतकी आहे, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेने दिली आहे. कोरोना काळात अनेक पत्रकार आणि त्यांचे सहकारी यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून वृत्तांकन केले आहे. कोरोना विरोधी लढ्यामध्ये पत्रकार हे ‘फ्रंटलाईन-वॉरियर्स’ म्हणून काम करीत आहेत.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कार्यरत असणारे सर्व पत्रकार बांधवाकरिता महापालिका अंतर्गत असणाऱ्या एकूण कोट्यापैकी कोणत्याही एका रुग्णालयामध्ये २० ऑक्सिजन बेड व १० व्हेंटिलेटर बेड तातडीने उपलब्ध करावेत, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
पत्रकारांचे मनोबल खचू नये…
कोरोनाच्या महामारीमध्ये आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या पत्रकार बांधवांचे मनोबल खचता कामा नये. यासाठी प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. पत्रकार बांधवांसह त्यांचे कुटुंबियांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कर्तव्यादरम्यान कोरोनाची लागण झाल्यास योग्यरीत्या उपचार व्हावे. या उद्देशाने त्यांना कोणतेही एक रुग्णालय आरक्षित असल्यास त्यांची धावपळ कमी होईल. बाधित पत्रकार बांधवाला योग्य ते उपचार वेळेत मिळतील. यासाठी शहरातील सर्व स्तरातील पत्रकार बांधवांसाठी बेड आरक्षित करावेत, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.