राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी वेधले लक्ष
शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कोरोनामुळे रुग्णांचे मृत्यू वाढले आहेत. परंतु, या परस्थितीत महानगरपालिका वैद्यकीय विभाग आणि शहरातील रुग्णालयांकडून मृत्यूची माहिती लपविली जात आहे. रुग्णालयाकडून उशिराने मृत्यूची नोंद करून रुग्णाचे नातेवाईकांची दिशाभूल केली जात आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूबाबत ही अतिशय गंभीर बाब आहे. याची आयुक्त राजेश पाटील यांनी दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. कोरोना बाधितांचे मृत्यू वाढले आहेत. महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयांकडून कोरोना बाधितांच्या मृत्यूची माहिती वेळोवेळी दिली जात नाही. त्यामुळे अचानक शहरात मृत्यूचा आकडा वाढल्याचे समोर येत आहे. सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात मृत्यूची नोंद झाल्याने शहरवासी हैराण झाले आहेत. शहरात २३ एप्रिल २०२१ रोजी ७१ मृत्यूची, दुस-या दिवशी २४ एप्रिल २०२१ रोजी ८१ मृत्यूची नोंद झाली होती. प्रत्यक्षात दोन्ही दिवसात मागील २४ तासात अनुक्रमे ८ व १२ मृत्यू झालेले आहेत. परंतु रुग्णालयांनी मृत्यूची माहिती उशिराने कळविल्याने मृत्यूच आकडे वाढल्याचे वैद्यकीय विभागाने म्हटले आहे.
दैनंदिन वैद्यकीय विभागांकडून दिल्या जाणा-या माहितीत व प्रत्यक्ष शहरात झालेले मृत्यू यात मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यावरून एप्रिल २०२१ महिन्यात महानगरपालिकेने आठशेहून अधिक मृत्यूची माहिती लपविल्याचे दिसते आहे. हे प्रकार विविध माध्यमांच्या बातम्यांव्दारे समोर आले आहेत. शहरात कोरोना बाधितांच्या मृत्यूची माहिती लपविणे गंभीर बाब आहे. उपचार व साधनाअभावी एकीकडे शहरात मृत्यू वाढले आहेत. तर मृत्यूनंतर देखील रुग्णालये आणि वैद्यकीय यंत्रणा मृत्यू माहिती, आकडेवारी लपवून त्यांचा अवमान करत आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालये वेळेवेर मृत्यूची माहिती न देता रुग्णाच्या नातेवाईकांकडून वैद्यकीय बिले घेऊन पैसे आकारत असल्याचा संशय या प्रकारामुळे निर्माण होत आहे.
या प्रकाराची महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तातडीने गंभीर दखल घ्यावी. योग्य चौकशी करून दोषी आढळणा-या रुग्णालये, संबधितांवर कारवाई करावी. कोरोना बाधित मृत्यूची कोणतीही आकडेवारी लपविली जाणार नाही, कोरोना बाधित रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांचा छळ होणार नाही, याची संपूर्ण खबरदारी महानगरपालिकेने घ्यावी, असे संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.