वाशिम : वडिलांचे छत्र हरपलेल्या दोन मुलींना नातेवाईकांनी सांभाळण्याची जबाबदारी घेतली पण फिरण्याच्या बहाण्याने मुंबईला घेऊन आल्यानंतर राजस्थान येथे विकल्याची धक्कादायक घटना वाशिममध्ये उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलींची सुटका केली असून आतंरराज्यातील टोळीचा छडा लावला आहे.
दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृ्त्तानुसार, वाशिम शहरातील वाल्मिकीनगर इथं कल्पना अशोक पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. कल्पना यांच्या बहिणीच्या पतीचे निधन झाले होते. त्यामुळे 11 आणि 8 वर्षांच्या दोन मुलींना नातेवाईक असलेल्या घनश्याम रामकिशन पवार आणि जयंत पवार या दोघांनी फिरण्याच्या बहाण्याने मुंबईला सोबत नेले होते.
पण, मुंबईत आल्यानंतर दोघांनी राजस्थान येथे मोठ्या मुलीला 4 लाख रुपयांत विकले होते. घरी परतल्यावर मुलगी पळून गेली अशी थाप मारली, असं सांगितलं होतं.
पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा छडा लावला असता धक्कादायक प्रकार समोर आला. पीडित मुलीला राजस्थान येथील डागरा येथे विकण्यात आले होते. तिथे संदीप हनुमान सिंग बांगडवा या आरोपीसोबत लग्न लावून दिले होते. या आरोपीने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तसंच त्याचे नातेवाईक मदन बांगडवा आण राकेश बांगडवा यांनी पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून पीडित मुलीने पळ काढला आणि गुजरात गाठले. गुजरातमध्ये पोहोचल्यावर पोलीस स्टेशनमध्ये आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर गुजरात पोलिसांनी वाशिम पोलिसांना फोन करून माहिती दिली. तेव्हा हा प्रकार समोर आला.
वाशिम पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन पीडित मुलीची सुटका केली. तसंच, या प्रकरणी आरोपींना राजस्थानमधून अटक केली. वाशिममध्ये मुलीला आणल्यानंतर पीडितेनं आपल्याला घनश्याम पवार आणि राजेंद्र पवार यांनी चार लाखांमध्ये विकले होते, अशी माहिती दिली.
वाशिम शहर पोलिसांनी नातेवाईक असलेल्या घनश्याम पवार आणि राजेंद्र पवार यांना बेड्या ठोकल्यात. तसंच एका दलालाही अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे