पिंपरी, 26 एप्रिल – थेरगाव येथील पदमजी पेपर समोरील मिल समोरील पी.के.मेटल वर्कस कंपनीत झालेल्या पावडरच्या स्फोटाची तीव्रता मोठी होती. स्फोटामुळे तीन किलोमीटर परिसरातील अनेक घरांच्या काचा फुटल्या आहेत. अतिशय दाट लोकवस्ती हा कारखाना आहे. स्फोटामुळे आजूबाजूला राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत. कारखान्याकडे अनेक महत्वाचे परवाने नाहीत. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरी वस्तीत असलेल्या या कारखान्याचे सर्व परवाने रद्द करावेत. कारखाना मालकावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, थेरगाव येथील पदमजी मिल समोरील पी.के.मेटल वर्कस कंपनीत शनिवारी स्फोट झाला. या कंपनीत फटाक्यांची दारू बनवण्यासाठी मॅगेशिअम ब्लॉक पासून पावडर तयार केली जाते. या पावडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्याचा आवाज जवळच्या दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात गेला. अनेक घरांच्या काचा फुटल्या गेल्या आहेत. स्फोट होऊन लागलेल्या आगीची तीव्रता भीषण होती. त्यात पी.के.मेटल वर्कस कारखाना संपूर्ण जळून खाक झाला. अतिशय दाट लोकवस्ती हा कारखाना आहे.
या कारखान्यामध्ये या पूर्वीही 2013 मध्ये स्फोट होऊन आग लागली होती. परंतु, या कारखान्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. या कारखान्याच्या आजूबाजूला देखील अनेक छोटेमोठे कारखाने आहेत. या स्फोटामुळे आजूबाजूला राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत. कारखान्याकडे अग्निशामक विभागाचा परवाना नाही. अग्निशमनचे साहित्य देखील कारखान्याकडे उपलब्ध नाही. महापालिकेचा परवाना, शॉपऍक्ट, इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरचे प्रमाणपत्र असल्याचे समजते. हे परवाने नागरी वस्तीत कसे दिले याची चौकशी करावी. कारखान्याचे अग्निशामन ना हरकत पत्र, शॉपऍक्ट, इमारतीचा बांधकाम परवाना, जागा मालक भाडे करार आणि कामगार आयुक्तांकडे करण्यात आलेली नोंदणी प्रमाणपत्र या कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. नागरी वस्तीत असलेल्या या कारखान्याचे सर्व परवाने रद्द करावेत. कारखाना मालकावर कारवाई करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.