शबनम न्युज / मुंबई
महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना लसीकरण युद्धपातळीवर होणे अत्यंत आवश्यक आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी राज्याला लस विकत घ्यावी लागणार आहे. त्याचा खर्च राज्याला करावा लागणार आहे. राज्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहीजे या भावनेतून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषद सदस्य आणि तसेच राज्यातील सर्व खासदारांचे एक महिन्याचे वेतन मिळून आणखी एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
लसीकरणासाठी मदत व्हावी, यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशा नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले.