रुग्णांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना
पिंपरी, १ मे – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑटो क्लस्टर येथील कोरोना हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत सेवा दिली जाते. असे असताना एक लाख रुपये घेऊन बेड दिल्याची तक्रार आहे. या तक्रारीत तथ्य आहे. काही डॉक्टरांच्या मदतीने महापालिकेचे काही नगरसेवक कोविड सेंटर चालवत आहेत. हे सर्व मिळून रुग्णांची लूट करत असून मेलेल्या नागरिकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. यामध्ये जो कोणी सहभागी असेल. जो कोणी ठेका घेऊन लूट करण्याचा प्रयत्न करत असेल. त्याच्यावर कारवाई करावी, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला केली.
ऑटो क्लस्टर येथील कोरोना हॉस्पिटल महापालिकेने स्पर्श संस्थेला चालवायला दिले आहे. या संस्थेला पैसे दिले जातात. तिथे मोफत उपचाराची सुविधा असताना या संस्थेने बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत हा मुद्दा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला. त्यावर पैसे घेणारा कोणीही असला तरी त्याची गय करायची नाही, अशी सूचना पवार यांनी महापालिका आयुक्तांना केली.
याबाबत अधिक माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, ऑटो क्लस्टर येथील हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करते. येथील बेडसाठी पैसे घेतल्याची तक्रार आहे. हा प्रकार गंभीर आहे. मेलेल्या नागरिकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. नागरिक त्रस्त, हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नागरिक आर्थिक संकटामध्ये आहेत. अशा परिस्थितीत जर नगरसेवक लूट करण्याचे काम करत असतील तर ते मानव जातीला काळिमा फासणारे आहे.
यात कोणाचीही गय करता कामा नये. आम्ही देखील महापालिकेत 20 वर्षे काम केले आहे. त्यामुळे सध्या होत असलेल्या व झालेल्या प्रकाराची खासगीत आम्हाला माहिती कळते. महापालिकेचे ऑटो क्लस्टर येथील कोविड हॉस्पिटलचे संचलन करणाऱ्या संस्थेने पैसे घेतल्याचा घटनेत निश्चितपणे तथ्य आहे. त्यामुळेच याप्रकरणाची सखोल चौकशी करावी. यामध्ये जो कोणी सहभागी असेल. जो कोणी ठेका घेऊन लूट करण्याचा प्रयत्न करत असेल. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.या बाबत लेखी पत्र देखील खासदार बारणे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.