पिंपरीतील ऑटोक्लस्टर रुग्णालयाचे शासनाकडून लेखा परिक्षण करा…..ॲड. सचिन भोसले
पिंपरी (दि. 2 मे 2021) पिंपरीमध्ये ऑटोक्लस्टर येथील रुग्णालयाचा सर्व खर्च पिंपरी चिंचवड मनपा करते. त्याचे व्यवस्थापन ‘स्पर्श’ संस्थेकडे आहे. या व्यस्थापनाबाबत वारंवार अनेक तक्रारी येत आहेत. मागील दोन दिवसांपुर्वी एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांकडून ऑटोक्लस्टर मध्ये बेड मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत दोषी असणा-यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे.
रविवारी (दि. 2 मे) ॲड. भोसले यांची गुगल मीटव्दारे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘स्पर्श’ व्यवस्थापनाबाबत शिवसेना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे. तसेच शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे याबाबत तक्रार अर्ज दिला आहे. ‘स्पर्श’ या व्यवस्थापनाला मनपाच्या अधिकारी व प्रशासनाने पाठीशी घालू नये. ऑटोक्लस्टर ‘स्पर्श’ व्यवस्थापनाला मागील वर्षभरात पिंपरी चिंचवड मनपाने किती कोटी रुपये अदा केले. याचा तपशील आणि दाखल असणा-या रुग्णांची संख्या, मृत रुग्णांचा तपशील त्यांची माहिती मनपाने सार्वजनिक करावी. या संस्थेला दिलेल्या सर्व देय रक्कमेचे शासकीय अधिका-यांमार्फत लेखापरिक्षण करावे. तोपर्यंत त्यांना कोणतीही रक्कम देऊ नये. तसेच या रुग्णालयांवर शासनाच्या वैद्यकीय विभागातील तज्ञ व्यक्तींची प्रशासक म्हणून नेमणूक करावी. तसेच स्पर्श संस्थेला काळ्यायादीत टाकावे, अशी मागणी ॲड. भोसले यांनी केली.
ॲड. भोसले म्हणाले की, देशात आणि राज्यात डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा तुटवडा भासत असताना ‘स्पर्श’ या दोन्ही रुग्णालयांचे व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ कोठून आणते. आमची अशी मागणी आहे की, याठिकाणी काम करणा-या डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशीयन, एक्सरे टेक्निशीयन, फार्मासिस्ट यांची प्रमाणपत्रे व अनुभव याबाबतची माहिती जाहिर करावी. या प्रमाणपत्रांची तपासणी सक्षम अधिका-यांकडून करावी. या दोन्ही रुग्णालयांबाबत मनपाच्या ‘डॅशबोर्ड’ वर उपलब्ध माहिती अद्ययावत नसते. या दोन्ही रुग्णालयात पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेरुन येणा-या रुग्ण संख्येवर नियंत्रण ठेवावे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांसाठी किमान एैंशी टक्के बेड राखीव ठेवावे, अशीही मागणी पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली.