शबनम न्युज / पुणे
सामाजिक अर्थसहाय योजनांचे ८७ हजार ३८१ लाभार्थ्यांसाठी २० कोटी २३ लाख ४२ हजार ७० रुपयाचे अर्थसहाय उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन २०२१-२२ या वर्षामध्ये आर्थिक व दुर्बल घटकांना दिलासा देण्याच्यादृष्टीने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना इत्यादी योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल व मे २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीचे अर्थसहाय एकत्रितपणे वितरण करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत येणा-या सामाजिक व विशेष अर्थसहाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हयासाठी प्राप्त झालेले रुपये २० कोटी २३ लाख ४२ हजार ७० रुपयाचे अनुदान १४ तालुक्यांना वितरीत करण्यात आले.
वर नमूद सर्व योजनेतील समाविष्ट असणा-या दारिद्रय रेषेखालील तसेच रु.२१ हजार च्या आत उत्पन्न असणारे दिव्यांग, निराधार, परितक्त्या, विधवा, घटस्फोटित, ज्येष्ठ नागरिक, तृतीय पंथी इत्यादी सर्व दुर्बल घटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळणार आहे. ही रक्कम तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यावर तात्काळ रकमा जमा करण्याबाबतची तहसील कार्यालयामार्फत कार्यवाही सुरु आहे. लाभार्थ्यांनी बँकामध्ये सुरक्षित अंतर ठेऊन कोविड १९ च्या उपाययोजनांबाबतच्या अटी व शर्तींचे पालन करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.