भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार लांडगे यांनी अधिकाऱ्यांशी बैठक नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे महावितरण प्रशासनाला ‘अल्टीमेटम’
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचड सर्वसामान्य नागरिकांसह औद्योगिक पट्टयात वीज पुरवठा बाबात नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह सोशल मीडियावर शेकडो तक्रारी येत आहेत. त्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांनी आता कारणे सांगू नये. समस्या निकालात काढून नागरिक, व्यावसायिक, उद्योजकांना न्याय दिली पाहिजे. अन्यथा महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
शहरातील वीज समस्यांबाबत आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर नीतीन काळजे, नगरसेविका नम्रता लोंढे, अधिक्षक अभियंता श्री. तगलपल्लेवार, कार्यकारी अभियंता श्री. गवारी, अति. कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.
शहरात अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी झाड्याच्या फांद्या पडून तसेच भूमिगत असणाऱ्या केबलवर पाणी जाऊन केबल नादुरूस्त झाल्या आहेत. त्याची तात्काळ दुरूस्ती करण्याची गरज आहे.
*
आमदार निधीतून केबल चाचणी व्हॅन…
चऱ्होली, प्राईड सिटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वीज खंडीत होत आहे तसेच स्पाईन रोड पेठ क्र.४,६,९ व ११ सह शहरात ठिकठिकाणी हीच समस्या आहे. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला कर्मचारी आणि अधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली. पावसाळ्यापूर्वी विद्युत विभागाच्या सर्व कामांची दुरुस्तीची कामे त्वरित करण्यात यावी. वीज पुरवठ्यामध्ये सुसूत्रता यावी. याकरिता आमदार निधीतून केबल चाचणी व्हॅन उपलब्ध करुन देणार आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी यावेळी दिली.
*
‘शटडाउन’ अगोदर नागरिकांना कळवा…
महावितरण प्रशासन दुरुस्तीचे काम करताना वीज पुरवठा खंडीत करते. त्यापूर्वी वीज बंद निवेदन नागरिकांना दिले पाहिजे. अनेकदा वीज पुरवठा खंडीत होणार आहे. याची माहिती नागरिकांना नसते. त्यामुळे तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘शटडाउन’ करण्यापूर्वी नागरिकांना माहिती द्यावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केल्या आहेत.
*
आळंदी रोडवरील वीज पुरवठा सुरळीत करा…
आळंदी रोड परिसरात महापालिका प्रशासनातर्फे रस्त्याचे काम सुरू आहे. संबंधित खोदाई करताना भूमिगत वीजवाहिनी नादुरूस्त झाली आहे. परिणामी, आळंदी रोडच्या पूर्वेकडील भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आमदार लांडगे यांनी तात्काळ महापालिका बीआरटी विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. संबंधित कंत्राटदारास नवीन केबल टाकण्याच्या सूचना केल्या आहेत.
*
अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही…
विद्युत कनिष्ट अभियंता कामचुकारपणा करीत आहेत. कोरोनाच्या काळात आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विविध कंपन्यांतील अधिकारी- कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. तसेच, शैक्षणिक क्षेत्रातील विविध कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. वीज पुरवठा विस्कळीत असल्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात कामचुकारपणा करणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी दिल्या आहेत.