पैठण : गाढेगाव पैठणचे माजी उपसरपंच असलेले कांताराव शिंदे यांचा मृतदेह सोमवारी सकाळी घरापासून काही अंतरावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस तपासात पूर्व वैमनस्य आणि शेतीच्या वादातून शिंदे यांचा खुन केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या काही तासात गावातील तीन आरोपींना अटक केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, गाढेगाव पैठणचे माजी उपसरपंच कांताराव श्रीपत शिंदे ( ४८) यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्याच शेतवस्तीवरील घरापासून काही अंतरावर आढळून आला. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, बीडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, प्रशांत मुंढे, ठसे तज्ञ अमोल पवार, पोलीस नाईक हरिश्चंद्र मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे व त्यांचे पथकही घटनास्थळी हजर झाले.
कांतराव शिंदे हे रविवारी घराबाहेर पडले होते. कधीकधी ते रात्री उशिरापर्यंत घरी येत नसल्याने उशीरा येतील म्हणून घरातील सर्वजण झोपी गेले. रात्री शिंदे घरी आले नाही म्हणून त्यांचा मुलगा लखन शोधण्यासाठी सोमवारी सकाळी घराबाहेर पडला. यावेळी वाळुज एमआयडीसी रोडवर शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. शिंदे यांना जबर मारहाण केल्याचे आढळून आले. त्यांच्या नाकातून रक्तस्राव झालेला होता तर सर्वांगावर मारहाणीचे वळ उमटलेले होते. मृतदेहाजवळ एक लाकडी दांडा, कमरेच्या पट्ट्याचे क्लिप आदी आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्याने शिंदे यांचा खुन करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस या बाबत तपास करण्याचे आदेश दिले. अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावत अनिल उर्फ पप्पू अशोक केदारे (२१), संजय मनोहर केदारे (२६), राजेश प्रभाकर केदारे ( २३) रा. गाढेगांव ता . पैठण यांना परिसरातील एका शेतातून ताब्यात घेतले. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास म्हसोबा पुलाजवळ शिंदे यांना बेल्ट आणि लाकड़ाने मारहाण करुन खुन केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक भागवत फुंदे , पोलीस उपनिरिक्षक संदीप सोळंके , गणेश राऊत, पोहेकों प्रमोद खांडेभराड , किरण गोरे , विक्रम देशमुख , श्रीमंत भालेराव , धिरज जाधव , पोना नरेंद्र खंदारे , संजय भोसले , वाल्मीक निकम , उमेश बकले , ज्ञानेश्वर मेटे , योगेश तरमाळे , संतोष डमाळे यांनी केली आहे .
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे