दंतशल्यचिकित्सक डॉ.जे.बी. गार्डे यांचा पत्रकार परिषदेत सल्ला
कोरोना रुग्णांना म्युकोर्मायकॉसिस पासून वाचविण्यासाठी दक्ष रहा : डॉ.जे.बी. गार्डे
अँटी फंगल इंजेक्शन पुरवठा, किंमती सुरळीत राहण्याची गरज
पुणे :
पुण्यात कोरोना रुग्णांवर म्युकोर्मायकॉसिस या बुरशीजन्य रोगाचा धोका वाढत असून
त्या पासून कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी डिस्चार्ज देण्यापूर्वी तोंडाचा एक्सरे -पीएनएस काढा , असा महत्वपूर्ण सल्ला एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे मॅक्सिलोफेशियल विभागप्रमुख ,
दंतशल्यचिकित्सक डॉ.जे.बी. गार्डे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयात बुधवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. गार्डे म्हणाले, ‘ पुण्यात विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये सुमारे एक हजार रुग्ण आढळले असून कोरोनानंतर या बुरशीची माहिती नसल्याने संसर्ग वाढत आहे, आणि वेळीच निदान, उपचार होत नसल्याने दात, वरचा जबडा, डोळे, दृष्टी, काही रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे.
कर्करोगाच्या वाढीपेक्षा हा संसर्ग वाढण्याचा वेग दहापट आहे.
सरकारने या संसर्गाची दखल घेऊन एस.ओ.पी. तयार केली पाहिजे
कोरोना रुग्णांना म्युकोर्मायकॉसिस वाचविण्यासाठी दक्ष रहाणे आवश्यक असून फिजिशियन, कोरोना उपचार केंद्रे, डेंटल क्लिनिक, ओरल मॅक्सीलोफेशियल सर्जन ( मुखशल्य चिकित्सक ) नाक – कान- घसा तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, न्यूरो सर्जन या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. रोगाचे निदान -उपचार -पुनर्वसन या तिन्ही टप्प्यात दंत शल्यचिकित्सक महत्वाचे योगदान देऊन रुग्णाचा प्राण वाचवू शकतात, असे डॉ.जे.बी. गारडे यांनी सांगितले.
वेळेवर निदान, शास्त्रशुद्ध उपचार, पुनर्वसन तिन्ही टप्प्यात हे सर्व डॉक्टर यांचे मोगदान महत्वाचे आहे.
कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये दात हलणे, दुखणं, पू येणे, फोड येणे, वास येणे, नाकातून पू येणे, दृष्टी कमी येणे,डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी यामुळे काही जणांना आपला वरचा जबडा,
डोळा देखील गमवावा लागला आहे. मृत्युचे प्रमाणही पन्नास टक्के इतके आहे, त्यामुळे लवकरात लवकर निदान होणे आवश्यक आहे. रुग्णाचे रोजचे ड्रेसिंग महत्वाचे आहे.
एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला ‘म्यूकर मायकॉसिस’ म्हणतात.
म्यूकर मायकॉसिसवर योग्यवेळी उपचार झाले नाहीत. तर, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो.
म्यूकर मायकॉसिसग्रस्त रुग्णांवर जबडा, डोळा, दात यांची शस्त्रक्रिया करावी लागते.
ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना या बुरशीची लागण होत नाही.परंतू, अनियंत्रित मधुमेह, कर्करोग, एडस् असणाऱ्यांना, तसेच स्टिरॉईडस्, सायक्लोस्पोरिन ही प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरणारी औषधे घेणाऱ्यांना हा आजार पटकन लक्ष्य बनवतो.
कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये वरचा जबडा, सायनस, डोळयांवर या बुरशीचा घातक परिणाम दिसत आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे या बुरशीचे संक्रमण होत नाही, मात्र दुषित मास्क, ऑक्सीजनच्या अस्वच्छ नळयातून बुरशीचे तंतू नाकातोंडात शिरकाव करु शकतो व सायनस मध्ये ठाण मांडून बसतात. हवेतील बुरशीमुळे ही संसर्ग होतो.
हिरडयातून पू येणे, दात हलणे, ताप येणे, डोके, डोळे दुखणे ही या संसर्गाची लक्षणे आहेत. डोळयातून मेंदूला संसर्ग झाला तर मेंदू दाह होऊन मृत्यू ओढावू शकतो. काही रुग्णांमध्ये जबडा, डोळा काढून टाकावा लागतो. या जबडयाचे ६ महिन्यांनी पुनर्निर्माण शस्त्रक्रियेद्वारे करता येते, कृत्रिम डोळा बसवता येतो. मात्र, दृष्टी जाते, असे डॉ.जे.बी. गार्डे यांनी सांगितले.