लोणावळा, ५ मे – खोपोली, रायगड भागातील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने मावळ तालुक्यातील लोणावळा, कामशेत येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोणाने विचार करून या हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा करण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रायगड जिल्हा प्रशासनाला केली आहे.
याबाबत खासदार बारणे यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना पत्र पाठविले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्रच रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्णांना ऑक्सिजनची मोठी गरज भासत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातही कोरोना रुग्णांचे प्रमाण आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली, कर्जत परिसरातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण लोणावळा, कामशेत परिसरात उपचार घेतात.
या हॉस्पिटलला आजतागायत खोपोली, खालापूर परिसरातून ऑक्सिजन मिळत होता. परंतु, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे या हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात नाही. खोपोली, रायगड भागातील रुग्ण मोठ्या संख्येने मावळ तालुक्यातील लोणावळा, कामशेत येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोणाने विचार करणे गरजेचे आहे. लोणावळा, कामशेत येथील हॉस्पिटलला रायगड जिल्ह्यातून ऑक्सिजन पुरवठा करून सहकार्य करावे, अशी सूचना खासदार बारणे यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना केली आहे.