पिंपरी, 5 मे – बोपखेलवासियांसाठी मुळा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी नगरसेवक म्हणून मी सातत्याने पाठपुरावा केला. लष्कर, संरक्षण विभागाकडून मंजू-या मिळवून आणल्या. यामध्ये बराच कालावधी गेला. सद्या उड्डाण पुलाचे काम मार्गी लागले असताना त्याची तरतूद वळविणे योग्य नाही. त्यामुळे पुलाच्या कामाला विलंब होऊ शकतो. नागरिकांना आणखी हाल सहन करावे लागतील. बोपखेलवासियांसाठीच्या पुलासाठीचा एकही रुपया दुसरीकडे वळविण्यास माझा तीव्र विरोध आहे. पुलासाठीचे पैसे दुसरीकडे वळविने अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे आगामी महापालिका सभेत इतिवृत्त मंजूर करताना बोपखेल पुलाची तरतूद वळविण्याची उपसूचना रद्द करावी, अशी विनंती उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी केली आहे.
याबाबत महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की,
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला होता. सहा वर्षांपासून बोपखेलवासियांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे नदीवर पूल बांधण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. लष्कर, संरक्षण विभागाकडून मंजू-या मिळवून आणल्या. त्यानंतर महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्याचा निर्णय घेतला. बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी पुल बांधण्याकरिता तरतूद ठेवण्यात आली.
महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून एन्ड. टी.इन्फ्रा या कंत्राटदाराला 53 कोटी 53 लाख 37 हजार रुपयांमध्ये पुलाचे काम दिले. बोपखेलवासियांच्या खूप जिव्हाळ्याचा हा प्रश्न राहिला. उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. लवकरच काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला होईल अशी आशा नागरिकांना आहे. त्यामुळे नागरिक समाधानी आहेत. असे असताना 30 एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पुलाच्या कामासाठी असलेल्या 17 कोटी 86 लाख 63 हजार रुपयांमधून 5 कोटी रुपयांची तरतूद झोपडपट्यांमधील महिलांना चादर, कंबल, संसारपयोगी साहित्य देण्याच्या लेखाशिर्षावर वळविण्यात आली. याला माझी तीव्र हरकत आहे.
बोपखेलवासियांसाठी हा पूल एकमेव दळणवनाचे साधन आहे. तरतूद वळविल्याने पुलाच्या कामाला विलंब होऊ नये. नागरिकांना आणखी हाल, अपेष्टा सहन कराव्या लागतील. माझ्या नागरिकांकरिता असलेले पुलासाठीचे हक्काचे पैसे दुसरीकडे वकविण्यास माझा तीव्र विरोध आहे. पुलाच्या कामाचा एकही रुपया वळवून देणार नाही. पुलाचे काम वेळेत मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी दुसऱ्या कुठल्याही लेखाशिर्षातून तरतूद वर्ग करावी. पण, बोपखेल पुलाची करू नये. आगामी महापालिका सभेत इतिवृत्त मंजूर करताना बोपखेल पुलाची तरतूद वळविण्याची उपसूचना रद्द करावी, अशी विनंती उपमहापौर नानी घुले यांनी केली आहे