शबनम न्यूज / पिंपरी
खासगी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोविड – १९ लसीकरणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी चे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे . दिलेल्य निवेदनात भाऊसाहेब भोईर यांनी नमूद केले आहे कि आपल्या देशात आणि पर्यायाने पिंपरी चिंचवड शहरात सद्य कोरोनाची दुसरी लाट आली असून संक्रमित होणाऱ्यांची संख्या उरात धडकी भरविणारी आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु सद्यस्थिती पाहता शहरात सर्वत्र लसींचा साठा अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असून लसीकरण केंद्रे सुद्धा अपुरी पडत आहेत त्यामुळे लसीकरणाला अद्याप वेग आलेला नाही.
दिनांक १ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण चालू केले असल्याने लसीकरण केंद्रांवर अत्यंत गर्दी होत असून या ठिकाणी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडत असून संक्रमणास पोषक वातावरण निर्माण होत आहे. परिणामी सदर लसीकरण केंद्र आणि तेथील कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. सदर सर्व बाबी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिलेली आहे त्यांच्या माध्यमातून खासगी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात कोविड – १९ लसीकरणासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हि परवानगी सोसायट्यांना मिळणार नसून खासगी रुग्णालयांशी टायअप करून सोसायट्यांनी हि परवानगी घ्यावयाची आहे.
तरी आपण मुंबई महापालिकेच्या धर्तीवर आपल्या शहरातही लसींचा मुबलक साठा उपलब्ध झाल्यानंतर खासगी गृहनिर्माण सोसायट्यांना खासगी रुग्णालयांशी टायअप करून सदर रुग्णालया मार्फत लसीकरणाची परवानगी देण्यात यावी. यामुळे सोसायट्यांच्या परिसरातील नागरिकांना आहे तिथेच लस मिळेल आणि लसीकरण केंद्रावरील येणारा अतिरिक्त ताण कमी होणार आहे तसेच समाजिक अंतर राखण्यास सुद्धा मदत होणार आहे. तरी आपण या पत्राचा विचार करावा आणि खासगी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोविड – १९ लसीकरणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी नगर सेवक भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.