पिंपरी, दि. ५ मे २०२१ :- महापालिकेच्या विविध निधींची गुंतवणुक १ ते ३ वर्ष कालावधी करीता जास्त व्याजदर देणा-या राष्ट्रीयकृत बँकेत करण्यास आज स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या विषयासह ऐनवेळचे विषय आणि महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या झालेल्या आणि येणा-या सुमारे १८ कोटी ३१ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
शासन निर्णयानुसार आणि स्थायी समितीच्या मान्यतेने महापालिकेच्या विविध निधींची गुंतवणुक १ वर्ष कालावधीकरीता राष्ट्रीयकृत बँकेत करण्यात येत आहे. १ वर्षासाठी बँकांचे दर हे अल्प असतात. त्यामुळे १ ते ३ वर्ष कालावधीकरीता महापालिकेच्या अटी व शर्ती मान्य करतील अशा राष्ट्रीयकृत बँकेत महापालिकेस आवश्यक नसलेल्या रक्कमांची गुंतवणुक शासन निर्णयानुसार करण्यात येणार आहे. अशा राष्ट्रीयकृत बँकाचे मागविलेले दर विचारात घेऊन त्या वेळेस ज्या बँकाचे दर जास्त असतील त्या कालावधीसाठी त्या राष्ट्रीयकृत बँकेत गुंतवणूक केली जाणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ९२ अन्वये नगरपालिका निधीत जमा असलेल्या ज्या शिलकी पैशाचा विनियोग या अधिनियमाच्या किंवा त्या अन्वये उभारलेल्या कोणत्याही कर्जाच्या प्रयोजनांसाठी ताबडतोब किंवा लवकर करता येणे शक्य नसेल तो पैसा व्याजाने बँकेत, किंवा सार्वजनिक कर्जरोख्यांत, केंद्र सरकार, राज्य सरकार, शासनाचे उपक्रम, महामंडळाकडे, सार्वजनिक कर्जरोख्यांत, शासनाच्या वित्तीय संस्था यांच्या कर्जरोख्यांत किंवा ऋणपत्रांमध्ये गुंतवणुक करण्यात येत असतो. यास स्थायी समितीने मान्यता दिली.
पिंपरीगाव येथील भैरवनाथ मंदीर इमारतीचे नुतनीकरणांतर्गत विद्युत विषयक कामे करण्याकामी ५० लाख ४४ हजार रुपये, पिंपरी वॉर्ड २१ मधील जोग महाराज उद्यानामध्ये विद्युत विषयक कामे करण्याकामी ६२ लाख २७ हजार रुपये, प्रभाग क्र. १० मधील मोरवाडी, मोरवाडी गावठाण आणि औद्योगिक परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्याकामी २५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
त्रिवेणीनगर परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याकामी ३९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. क क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे तातडीने उभारावयाच्या ४०० बेडच्या कोवीड-१९ रुग्णालयाकरीता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपनी कडून उच्चदाब विजपुरवठा जोडून घेणेकामी १ कोटी ३१ लाख रुपये सुरक्षा ठेव शुल्क रक्कम म्हणून अदा करण्यात येणार आहे यास स्थायी समितीने मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि त्याअंतर्गत विविध ठिकाणी स्थापत्य विषयक व फर्निचरची कामे करण्यासाठी ७२ लाख रुपये, प्रभाग क्र. २२ काळेवाडी मधील परिसरामध्ये आवश्यकतेप्रमाणे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्याकामी ७० लाख रुपये खर्च होणार आहेत.
प्रभाग क्र. ९ मासुळकर कॉलनी, यशवंतनगर, उद्यमनगर, अजमेरा परिसरात आवश्यक ठिकाणी स्टॉर्म वाटर्स लाईन टाकणे आणि इतर देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकामी ३३ लाख रुपये तर मासुळकर कॉलनी मधील आवश्यक ठिकाणी पावसाळी गटरची सुधारणा आणि इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी २७ लाख रुपये खर्च होणार आहेत यास स्थायी समितीने मान्यता दिली.