पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे त्यांच्या खास आणि डॅशिंग शैलीसाठी ओळखले जातात. याची प्रचिती त्यांनी पुन्हा एकदा आणून दिली. सामान्य नागरिकांना पोलीस योग्य पद्धतीने सेवा देतायेत का? सामान्य नागरिकांचं यातून समाधान होतंय का? हे अनुभवण्यासाठी स्वतः कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर केलं. चक्क ‘मटणवाले चाचा’ बनून त्यांनी पोलिसांची परीक्षा घेतली. यात काही पोलीस पास तर काही नापास देखील झाले. नापास झालेल्यांची आता मात्र खैर नाही. यासाठी मध्यरात्री चार तास त्यांनी पाहणी केली.
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात काही पिंपरी चिंचवडमधील पोलीस अंमलात आणताना दिसत नाहीत.
तशा तक्रारींचा सूर अनेकदा सामान्य नागरिकांमधून उमटताना दिसून येतो. अगदी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे ही काही नागरिकांनी तो पाढा वाचला होता. म्हणून हे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन अनुभवण्याचं पोलीस आयुक्तांनी ठरवलं. पण कसं? यासाठी वेशांतर करण्याचं त्यांनी ठरवलं. बुधवारी रात्री कोणाला खबर लागू न देता त्यांनी मुस्लिम व्यक्तीचा पेहराव केला. अगदी ‘मटणवाले चाचा’ दिसतील असे कपडे-गोल टोपी घातली आणि दाढी-केस लावले. कोणती शंका येऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांना चाचीची भूमिका त्यांनी दिली. रात्री बाराच्या ठोक्याला खाजगी वाहनातून ते बाहेर पडले.
हिंजवडी आणि वाकड पोलीस पास
हिंजवडी, वाकड आणि पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः तक्रारदार म्हणून पोलीस आयुक्त गेले. यात हिंजवडी आणि वाकड पोलीस पास झाले. इथं रात्रपाळीला उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी कृष्ण प्रकाश यांच्या गुगली प्रश्नांना योग्य उत्तरं दिली. सामान्य नागरिकांना जी सेवा आणि प्रतिसाद देणं गरजेचं आहे, त्या कसोटीवर इथले कर्मचारी उतरले. वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोहचण्याआधी एका ठिकाणी फटाके फोडले जात होते. तशी तक्रार स्वतः कृष्ण प्रकाश यांनाच आली होती. त्याचाच आधार घेत त्यांनी तक्रार केली. सोबत असणाऱ्या प्रेरणा कट्टे यांची ही तिथं छेड काढल्याचं ते म्हणाले. हे ऐकताच वाकड पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत तरुणांनी पळ काढला होता. मग ते कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी तक्रार करावी असं कर्मचारी म्हणाले. तेव्हा चाचा उच्चारले, आता मध्यरात्र झाली आणि मला रोजा पकडण्यासाठी घरी पोहचणे गरजेचे आहे. यावर कर्मचाऱ्यांनी घडला प्रकार गंभीर असल्याने तुम्हाला तक्रार द्यावीच लागेल, असा आग्रह धरला, ही बाब पोलीस खात्याच्या दृष्टीने योग्य होती. तेव्हा चाचांनी खरी ओळख सांगितली. इथं पोलीस पास झाले.
तिथून पिंपरी पोलिसांकडे मोर्चा वळला. दरम्यान दोन नाकेबंदीतून त्यांचं खाजगी वाहन गेलं. कडक लॉकडाऊनच्या नियमानुसार नाकेबंदीत चौकशी करणं अपेक्षित होतं. पण एका ठिकाणी पोलीस मोबाईलमध्ये दंग होते तर दुसऱ्या ठिकाणी पोलिसांचा आळशीपणा दिसून आला. मग ते पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. शेजाऱ्याला रुग्णवाहिकेची गरज आहे, मात्र ते अडवणूक करून अवाजवी पैशांची मागणी करतायेत, अशी तक्रार केली, यावर तिथल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा व्यवहार योग्य नव्हता. एकतर तुम्ही पोलीस चौकीत जा अथवा शासकीय रुग्णवाहिका बोलवा असं कर्मचारी म्हणाले. पण शासकीय रुग्णवाहिकेचा हेल्पलाईन नंबर वारंवार व्यस्त येत आहे. त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका बोलावणं गरजेचं आणि तुम्ही आमची मदत करा असं चाचा उच्चारले. पण तरी प्रतिसाद शून्य होता. इथं हे पोलीस नापास झाले. पहाटे चार वाजता मटणवाले चाचा पोलीस आयुक्तांच्या भूमिकेत पुन्हा आले. या चार तासात पास झालेल्या पोलिसांचं कृष्ण प्रकाश यांनी कौतुक केलं, पण नापास झालेल्यांना आता मेमो दिला जाणार आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलेल्या वेशांतराचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. प्रत्येक शहरातील पोलीस प्रमुखांनी वेशांतर करून, आपल्या कर्मचाऱ्यांवर करडी नजर ठेवायलाच हवी. तेंव्हाच “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने अंमलात आलं, असं म्हणता येईल.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे