शबनम न्यूज / पिंपरी
स्पर्श हॉस्पीटलने केलेला भ्रष्ट्राचार, रुग्णांकडून स्विकारलेले पैसे व स्पर्श हॉस्पीटलचे सीईओ डॉ. अमोल होळकुंदे यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करुन फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी चे नगर सेवक योगेश बहल यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कडे दिले आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे कि
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील करोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी ऑटो क्लस्टर येथे कोविड समर्पित रुग्णालय सुरू केलेले आहे. या रुग्णालयासाठी मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याचा ठेका स्पर्श हॉस्पीटल (फॉऱ्च्यून स्पर्श हेल्थकेअर प्रा.लि.) या कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीकडून गेल्या 9 महिन्यांपासून महापालिकेची आणि कोविड रुग्णांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. हा प्रकार माझ्या लक्षात आल्यानंतर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मी सातत्याने आवाज उठवित आहे. ऑटो क्लस्टरशिवाय या कंपनीने एकही रुग्ण न तपासता भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय व हिरा लॉन्स या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारल्याचे बोगस भासवून महापालिकेची 3 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण मी काही दिवसांपूर्वी उजेडात आणले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या रक्कमेचा सुरू असलेला अपहार लोकांसमोर आणणे, असे प्रकार थांबविणे व चुकीच्या कामांना विरोध करणे व अशी कामे होऊ नयेत यासाठी सजग राहणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे.
भोसरीतील प्रकरणानंतर स्पर्शच्या माध्यमातून ऑटो क्लस्टर येथे सुरू असलेल्या रुग्णांच्या आर्थिक लुटीचा प्रकार भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड व विकास डोळस या नगरसेवकांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणात तीन डॉक्टरांना अटक झाली आहे. तसेच डॉक्टरांकडून तीन लाखांहून अधिकची रक्कमही जप्त करण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठी आर्थिक अफरातफर होऊन महापालिकेची फसवणूक स्पर्शने केल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना स्पर्श हॉस्पीटलचे सीईओ अमोल होळकुंदे हे राजकारणाने प्रेरित होऊन कोणाच्यातरी सांगण्यावरून बेजबाबदार, चुकीची व आमची बदनामी करणारी वक्तव्ये करत आहेत. आरोप करताना त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. वस्तुत: होळकुंदे हे स्पर्शचे कर्मचारी असून या कंपनीचे सहा संचालक आहेत. या संचालकांनी होळकुंदे यांच्या मार्फत आमची बदनामी सुरू केल्याचे माझे म्हणणे आहे.
स्पर्शमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी केवळ डॉक्टरवर गुन्हा दाखल करून चालणार नसून या कंपनीच्या सीईओसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. या ठेकेदारीमध्ये काही छुपे भागीदार असल्याचा माझा संशय असून निष्पक्ष चौकशी करून या कंपनीच्या संचालकांसह छुप्या भागीदारांनी केलेला भ्रष्टाचार उजेडात येण्याची गरज आहे. तरी माझी विनंती आहे की, मी उपस्थित केलेल्या मुद्यांची सखोल चौकशी होऊन दोषींवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी.
1) स्पर्शचे सीईओ डॉ. अमोल होळकुंदे यांनी सोशल मिडीयावर राष्ट्रवादीच्या एका माजी महापौरांनी पैसे मागितले व त्याची पुर्तता न केल्यामुळे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. तरी माझी आपणास विनंती आहे की, होळकुंदे यांना आपण चौकशीला बोलावून राष्ट्रवादीच्या ज्या माजी महापौराने पैसे मागितले त्याबाबत चौकशी करावी. अमोल होळुकुंदे यांना ज्या मध्यस्थामार्फत पैसे मागितले त्या मध्यस्थाचा शोध घ्यावा, तसेच होळकुंदे यांच्या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढून आरोपांची सत्यता तपासणून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. होळकुंदे यांच्या तसेच स्पर्शचे संचालक विनोद आडसकर यांच्या मोबाईलचा सीडीआर काढल्यास अनेक भ्रष्ट बाबी तात्काळ उजेडात येतील. त्याद्वारे समोर येणाऱ्या बाबींचा तपास करून खोटे बेालणाऱ्या होळकुंदे यांच्यासह सर्व संचालकांवर कडक स्वरुपाची फौजदारी कारवाई करावी.
2) स्पर्शने भोसरी येथील रामस्मृती व हिरा लॉन्समध्ये बोगस कोविड केअर सेंटर सुरू करून महापालिकेची 3 कोटी 29 लाखांची फसवणूक केली असून त्या ठिकाणी त्यांनी दाखविलेल्या बोंगस कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांच्या उपस्थितीबाबत तसेच त्यांच्या नावांची चौकशी करून डॉक्टर व नर्सेस बोगस असल्यास स्पर्शच्या संचालक मंडळावर व बोगस डॉक्टर नर्सेसवर फौजदारी गुन्हा दाखल करून महापालिकेकडून उकळलेली रक्कम जप्त करून ती महापालिकेला परत करण्यात यावी.
3) ऑटो क्लस्टर येथे रुग्णांच्या नातेवाईकांकडून स्विकारण्यात आलेल्या रक्कमेसंदर्भात सखोल चौकशी होण्याची गरज आहे. केवळ तीन डॉक्टर यामध्ये सहभागी नसून स्पर्शचे सीईओ अमोल होळकुंदे व संचालक मंडळाचाही या गुन्ह्यामध्ये सहभाग असून वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय कनिष्ठ कर्मचारी अथवा डॉक्टर असे कृत्य करणे शक्यच नसल्यामुळे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढण्यात यावा, तसेच यामध्ये ज्या संचालकांच्या व सीईओच्या सांगण्यावरून रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे स्विकारले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
4) ऑटो क्लस्टर रुग्णालयामध्ये महापालिकेने कॅमेरे बसविले असून या कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेऊन त्याचीही चौकशी करावी. त्याद्वारे अनेक गंभीर बाबी निदर्शनास येण्याची शक्यता आहे. साहेब आपणांस विनंती आहे की सदर सेंटरचे CCTV Footage तपासल्यास ऑटो क्लस्टरमध्ये इतर कोणत्या हितसंबंधी व्यक्तींचा वावर असतो, या ठिकाणी ज्या चुकीच्या आणि गंभीर, अनधिकृत बाबी सुरू असतात ते देखील समोर येईल. तसेच ज्या दिवशी भाजपाच्या नगरसेवकांनी पैसे स्विकारल्याचे प्रकरण उजेडात आणले. त्याच दिवशी लाखो रुपयांची रक्कम देऊन हे प्रकरण मिटविण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले, त्या लोकांची उपस्थिती व त्यावेळी नेमके काय घडले, ते देखील समोर येऊ शकते. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजची आपण गांभिर्याने चौकशी करावी.
5) स्पर्शचे सीईओ डॉ. अमोल होळकुंदे यांनी तथ्यहिन आरोप करत अप्रत्यक्षपणे माझी व माझ्या पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, या चौकशीमध्ये कधीही माझी चौकशी करावयाची असल्यास मी स्वत: चौकशीला हजर राहण्यास तयार आहे.
6) हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरुपाचे असल्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून होणे अत्यंत आवश्यक आहे. स्पर्शचे संचालक मंडळ, बोगस डॉक्टर व स्पर्शचे सीईओ अमोल होळकुंदे, महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी मिळून केलेला हा भ्रष्टाचार असल्याने या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी. स्पर्शचे संचालक विनोद आडसकर यांच्या पत्नी अंजली ढाणे – आडसकर या महापालिकेच्या वैद्यकीय विभागात नौकरी करत आहेत. महापालिकेच्या नियमानुसार (बीपीएमसी ॲक्टचे 59 कलम) स्पर्श हॉस्पीटलला हे काम मिळूच शकत नाही. कायदेशीर तरतुदींना बाजूला ठेवून सुरुवातीपासून केवळ भ्रष्टाचार करण्याच्या हेतूनेच स्पर्शला ठेका देण्यात आला आहे. त्यामुळे याचीही चौकशी करण्यात यावी.
स्पर्श हॉस्पीटलच्या बाबतीत माझी आपणास या पत्राद्वारे नम्रतापूर्वक विनंती आहे की, वरील बाबींचा तपास करून सत्य समाजासमोर येणे अत्यंत आवश्यक आहे. माझ्या ३० वर्षाच्या सार्वजनिक जीवनात नगरसेवक व इतर महत्वाच्या पदावर काम करताना माझी शहरात जी प्रतिमा तयार झालेली आहे, त्यास तडा देण्याचे काम अशा खोट्या आरोपांमुळे होत आहे. तसेच काहीजणांना हाताशी धरून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रकार सुरू आहे. एका वेबपोर्टलच्या माध्यमातून माझे व माझा व्यक्तीशा ज्या लोकांचा कसलाही सबंध नाही अशा भारतीय जनता पक्षाच्या काही सन्माननियांची छायाचित्रे टाकून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. हा प्रकार स्पर्शच्या प्रकरणात छुपी भागीदारी असणाऱ्या राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे माझे कोठेही नाव स्पर्शच्या व्यक्तींनी घेतलेले नसताना ज्या व्यक्तीने खोटी व माझी बदनामी करणारे वृत्त प्रसिद्ध केले, त्याबाबतही चौकशी करून बदनामी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, खोटया बातम्या, सोशल मिडियाद्वारे चुकीची व बदनामी करणाऱ्या मिम्स् तयार करून काही ठराविक कार्यकर्त्यांमार्फत स्पर्शमध्ये छुपी भागीदारी असणारया राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून माझी राजकीय व सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. मी व्यक्तीशा त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार आहेच परंतू आपणास विनंती आहे की, आपण पोलीस यंत्रणेमार्फत जाणिवपूर्वक बदनामी करण्याच्या प्रकारामागे कोण आहे त्याचा तपास करून सत्य बाहेर आणावे.
स्पर्शच्या एकुण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात स्पर्शला पैसे मागणारे, भ्रष्टाचार करणारे, तसेच स्वत:ची पापे लपविण्यासाठी खोटे आरोप करणारे उजेडात येणे अत्यंत आवश्यक आहे. स्पर्श प्रकरणात छुपी अथवा उघड भागीदारी असणारे तसेच त्यांना पैसे मागणारे, होळकुंदे यांच्या माध्यमातून खोटे आरोप करणारे स्पर्शचे संचालक, सल्लागार, डॉक्टर जे कोणी दोषी असतील त्यांच्याबाबती अत्यंत सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणावे, व त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करणयात यावी,
योगेश बहल यांनी स्वतः आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेऊन कार्यवाही करण्याची मागणी केली त्यांच्या मागणीला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनीही सकारात्मकता दाखवीत सादर घटनेची सखोल चौकशी करणार असल्याचे सांगितले असल्या ची माहिती नगर सेवक योगेश बहल यांनी बोलतांना सांगितले