यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस तर्फे ‘मानवाधिकार’ विषयावरील वेबिनार संपन्न
पिंपरी : दिनांक ७ मे २०२१ :मानवाधिकार ही संकल्पना स्पष्ट करीत वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, भाषा, धर्म असे कोणत्याही प्रकारचे भेद मानवाधिकारांच्या आड येत नाही असे सांगत मानवाधिकार हे सर्व माणसांचे मूलभूत अधिकार आहेत असे मत अॅड. चंद्रकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) यांच्या वतीने ‘मानवाधिकार’ या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मानवाधिकारामध्ये जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य, आपले मत मांडण्याचा अधिकार, गुलामी व अन्यायापासून मुक्तता, शिक्षण व काम करण्याचा अधिकार, सन्मान,न्याय,समता व आदर यांचा समावेश होतो असे सांगितले. कायद्याचा अधिकार,कामगारांचे अधिकार,शेतकऱ्यांचे अधिकार व घटनात्मक अधिकार यांच्यातील वर्गीकरण समजावून सांगत देशा-देशातील हे अधिकार भिन्न असतात असेही सांगितले. मानवाधिकार ही एक जागतिक संकल्पना असून आपल्या देशाच्या घटनेमध्येही मानवाधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. मानवाधिकार हे जगातील प्रत्येक मानवाचे मूलभूत अधिकार असून ते त्याच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत.
मानवाधिकार हे शिक्षणाचा भाग असायला हवा असे सांगत प्रत्येकाने आपापले अधिकार जपत असतानाच आपापल्या कर्तव्याचीही जाणीव ठेवावी, असे अॅड.चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने स्वतःसोबतच दुसऱ्यांच्या अधिकारांची जपणूक होईल, कोणावरही अन्याय होणार नाही याबाबत दक्ष असावे असे सांगत अॅड.चंद्रकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्यासह अन्य अध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला. वेबिनारचे समन्वयक म्हणून डॉ. पुष्पराज वाघ यांनी काम पाहिले