शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये घर मिळण्यासाठी अनेक गोरगरीबांनी अर्ज केले होते. यामध्ये ३६६४ सदनिकांसाठी एकूण ४८ हजार नागरिकांनी अर्ज भरले होते. आणि त्याकरिता 5000 रुपये नागरिकांकडून अनामत रक्कम म्हणून भरुन घेण्यात आलेली होती. मात्र या सोडतीत ज्यांचे नाव आलेले नाही, अशा नागरिकांची डिपोझिट रक्कम त्यांना परत करावी, या मागणीचे निवेदन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले होते .
सदर निवेदनात बनसोडे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांच्या सोडतीच्या यादीत नाव न आल्याने नागरिकांची निराशा झालेली आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिकस्थिती खूपच बिकट होत चालली आहे. तरी, पंतप्रधान आवास योजनेतील लॉटरीमध्ये नाव न आलेल्या नागरीकांनी बयान रक्कम म्हणून भरलेले ५००० रुपये तातडीने त्यांच्या बँक ख्यात्यात जमा करण्यात यावेत. अशी आग्रही ही मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी निवेदनामार्फत केली होती .
सदर निवेदनाची दखल घेत महापालिकेने प्रतीक्षा यादीत नाव नसलेल्या २१००० अर्जदाराचे पाच हजार रुपये पालिकेने परत केले आहेत व उर्वरित लोकांचे पुढील आठवड्यात परत करणार आहेत. अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बडोदे यांनी दिली .