बीड (गेवराई ) : धुणे धुण्यासाठी आईसोबत गेलेला तिचा पाच वर्षाचा मुलगा हा नदीकाठी खेळत असताना त्याचा तोल गेल्याने तो नदीपात्रात पडला. यानंतर तो बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी त्याच्या आईने नदीपात्रात उडी घेतली. मात्र या घटनेत आईसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील संगमजळगांव येथे रविवारी (दि.०९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. एकीकडे जागतिक मातृदिन साजरा होत असताना याच दिवशी आईसह चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
पल्लवी गोकुळ ढाकणे (वय २६) व तिचा मुलगा समर्थ गोकुळ ढाकणे (वय ५) दोघे (रा.संगमजळगाव) अशी नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत
संगमजळगाव हे गोदावरी नदी काठी असलेले गाव आहे. दरम्यान पल्लवी ढाकणे या नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी कपडे धुण्यासाठी गोदापात्रात गेल्या होत्या. सोबत पाच वर्षाचा समर्थही गेला होता. पल्लवी या धुणे धुण्यात व्यस्त असताना नदीकाठी खेळणारा समर्थ अचानक पाण्यात गेल्याने तो गोदापात्रात बुडू लागला होता. यावेळी त्याला वाचविण्यासाठी पल्लवी ढाकणे यांनी देखील गोदापात्रातील पाण्यात उडी मारली.
दरम्यान गोदापात्रात धुणे धुणाऱ्या काही महिलांनी आरडाओरड करत गावाकडे धाव घेऊन मदतीसाठी आवाहन केले. मात्र गावातील तरुण येईपर्यंत पल्लवी पल्लवी सह त्यांचा पाच वर्षाचा समर्थ या दोघांचा बुडून मृत्यु झाला होता. यानंतर या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच दोघांचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले.
मातृदिनी घडली घटना
रविवारी जागतिक मातृदिन होता. दरम्यान या दिवशीच आपल्या चिमुकल्या मुलाला बुडताना पाहून स्वतःला पोहता येत नसताना देखील पल्लवीने नदीपात्रात उडी घेऊन आपल्या पाच वर्षाच्या समर्थला वाचविण्यासाठी धडपड केली. मात्र या दुर्दैवी घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मातृदिनी घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे