अन् चिखलीत अवतरलं दत्ताकाकांचं पत्र! मातृदिनाची अनोखी भेट : काळजी आणि आधाराच्या शब्दांनी हेलावलं मातृत्व
चिखली : पूर्वी पत्र हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. लोक पत्राची आतुरतेने वाट बघायचे. पण मोबाईलमुळे पत्र हा विषयच नामशेष झाला आहे. तेव्हा पत्रं जगण्याचा आधार होती. पत्र जगण्याचं बळ द्यायची. दूरदेशी असलेल्या मुलांचं पत्र आलं आई-बापाचं काळीज हळवं व्हायचं. डोळ्यांच्या कडा ओलावायच्या… असाच अनुभव चिखलीकरांनी घेतला. मातृदिनाच्या निमित्तानं दिवंगत दत्ताकाका साने यांनी पाठवलेलं पत्र घराघरात पोहोचलं अन् चिखलीकरांची मनं हेलावून गेली.
राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांचं मार्चमध्ये कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चिखलीकरांचा जणू आधार हरपला. कोरोना संकटात आपल्या हक्काचा माणूस आपल्याला सोडून गेल्याची भावना लोकांमध्ये असतानाच रविवारी अचानक चिखलीतील प्रत्येक घरात एक पत्र पोहोचलं. मातृदिनाच्या निमित्तानं दत्ताकाका साने यांनी प्रत्येक घरातील प्रत्येक आईसाठी हे पत्र लिहिलं होतं. या पत्रात दत्ताकाका सांगतात की, आई, मी अचानक तुला सोडून गेलो असलो तरी काळजी करू नको. माझा मुलगा यश आहे तुझी काळजी घ्यायला. काहीही मदत लागली तरी निसंकोचपणे सांग, तो तुझ्यापाठी खंबीरपणे उभा राहील.
कोरोनाविषयी ते लिहितात की, ‘आई, कोरोना निष्ठूर आहे. जगभरात त्यानं हाहाकार माजवलाय. तू स्वत:ची काळजी घे. गर्दीत फिरू नको. मास्क घाल, लस टोचून घे. घाबरू नकोस संकटांचं आयुष्य फार थोडं असतं. कोरोनाचे हे संकटदेखील टळून जाईल. सगळं काही पूर्वीसारखं होईल. फक्त एकमेकांपासून दूर राहून या संकटाशी लढणं गरजेचं आहे.’
दत्ताकाकांचं हे भावनिक पत्र वाचून अनेकांचे डोळे भरून आले. मोबाईलच्या या जमान्यात आपल्याला कुणाचं तरी पत्र येईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मातृदिनाच्या निमित्तानं प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला एक अनोखी भेट मिळाली ती यश दत्ता(काका) साने यांच्यामुळे. कोरोनामुळे सगळ्यांचेच मनोधैर्य खचले आहे. लोकांमध्ये जगण्याची इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी आणि या संकटात तुम्ही एकटे नाही तर आम्ही आहोत तुमच्या मदतीला याची जाणीव करून देण्यासाठी यश साने यांनी हा पत्राचा अनोखा उपक्रम राबविला. नागरिकांमधून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
मानसिक बळ वाढविणारे पत्र
पत्रं हृदयातल्या हळव्या कप्प्यासारखी असतात. अजूनही कुणी पत्रं पाठवलं, की खूप छान वाटतं. आपल्या हक्काचं कुणीतरी भेटल्याचं समाधान वाटतं. दत्ताकाकांच्या या पत्रामुळे आमचे मनोधैर्य वाढले आहे. मानसिक बळ वाढल्यामुळे कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्यास मदत होईल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.