शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी, – करोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नसतानाच तिसर्या लाटेसंदर्भात सातत्याने भाकिते वर्तविली जात आहेत. या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेसह तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी दोन कोविड आयसोलेशन सेंटरसह मासुळकर कॉलनीतील रुग्णालयात सुसज्ज यंत्रणा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी माजी महापौर योगेश बहल यांनी केली आहे.
याबाबत बहल यांनी आयुक्तांना लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, सध्या आपण करोनाच्या दुसर्या लाटेला तोंड देत आहोत. या लाटेमध्ये आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडून गेलेली आपण पाहिली आहे. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर बेड, रेमडेसीवीरसह अपुर्या वैद्यकीय सुविधांमुळे अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. इतर ठिकाणच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरातील वैद्यकीय स्थिती समाधानकारक असली तरी संभाव्य तिसर्या लाटेसाठी आपण तयार राहिले पाहिजे.
जागतिक आरोग्य संघटना, आसीएमआरसह जगातील तज्ञांनी तिसर्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची भिती वर्तविली आहे. संभाव्या तिसर्या लाटेच्या अनुषंगाने आतापासून आपण युद्धपातळीवर सर्व व्यवस्था करण्याची गरज आहे. लहान मुले व त्यांच्या पालकांसाठी महापालिकेेने तात्काळ दोन मोठे कोविड केअर सेंटर उभी करावीत तसेच महापालिकेने मासूळकर कॉलणी येथे उभारलेल्या रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज यंत्रणा निर्माण करावी. लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारले गेल्यास तसेच शहर पातळीवर वैद्यकीय यंत्रणा उभी करून आपण सज्ज राहिले पाहिजे, असेही बहल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.