पिंपरी-चिंचवड शहरातील लसीकरण केंद्र एक दिवस आड ( Alternate Day) करावे अशी मागणी राष्ट्रवादी चे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकाठी केली आहे. दिलेल्या निवेदनात प्रशांत शितोळे यांनी सांगितले आहे कि शहरात गेली दोन महिने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण चालू आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची पूर्ण व्यवस्था केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात समन्वय नसल्यामुळे पूर्णपणे बिघडलेली आहे असे चित्र आहे व त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात महानगरपालिकेनं जवळपास 90 ठिकाणी लसीकरण केंद्र केली परंतु, या केंद्रांमध्ये लसीकरण चालू झाल्यापासून ते आजपर्यंत किती लसीकरण झाले ? यासाठी किती मनुष्यबळ लागले ? किती दिवस बिना लसीकरणाचे गेले? याचा विचार केला तर तुटपुंजा आकडा समोर येतो.
लसीकरणाच्या सुरुवातीला लसीकरण करून घेण्याचे प्रमाण कमी होते परंतु गेल्या काही दिवसांमध्ये लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक केंद्रांवर गर्दी करत आहेत त्यातच केंद्र सरकारने प्रत्येक नागरिकास लस मिळेल यासाठी cowin वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यास सांगितले परंतु लस उपलब्धता करून दिली नाही. त्यामुळे अनेक लोक आज लसीकरणापासून वंचित राहत आहेत तर अनेक जण पहिला डोस मिळाल्यानंतर दुसरा डोस मिळत नाही म्हणून वंचित राहत आहेत.
भारत सरकार व महाराष्ट्र शासन काय करेल ते करेल परंतु महानगरपालिका सत्ताधाऱ्यांनी व प्रशासन यांनी सुद्धा उपलब्ध असलेल्या सेवा -साधनांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठीच आपण खालील प्रमाणे लसीकरण केंद्रं बाबत नियोजन करणे आवश्यक आहे.
क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील केंद्र एक दिवस आड (Alternate Day) चालू राहतील व त्यावेळी लस पुरेल असे नियोजन करणे.
प्रत्येक लसीकरण केंद्रावर किमान दोनशे नागरिकांचे लसीकरण होईल अशी व्यवस्था करणे.
दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे कारण सुरुवातीला ज्येष्ठांचे लसीकरण होते त्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्यावे लागेल
लसींची उपलब्धता लवकरात लवकर व्हावी यासाठी गरज पडल्यास केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन यांच्याकडून खरेदी घेणे बाबत निर्णय घेणे.
कोरोना तिसरी लाट येईल अशा शक्यता असल्याने जास्तीत जास्त नागरिक प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतील असे नियोजन करणे.
वॅक्सिन टास्क (Vaccination Task )मानून त्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर देणे बाबत विचार करणे.
लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सी एस आर च्या माध्यमातून योग्य ते सहकार्य घेणे.
कोरोना च्या या भयंकर परिस्थितीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत परंतु अनेक प्रकारचे पर्याय सुद्धा आहेत यासाठी शहरातील अनेक अनुभवी व माहितगार लोकांना अशावेळी बोलावून घेऊन आपत्कालीन परिस्थितीत एखादी गोष्ट चे नियोजन सुद्धा योग्यरीत्या होऊ शकते याचा अनुभव आपणास येईल.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा असून यासाठी आपले शहर यशस्वी झाले तर आपले शहर पूर्ण मुक्त राहील अशी खात्री यावेळी वाटते. त्यामुळे सूचना योग्य असतील तर नक्की अंमलबजावणी करा हीच पिंपरी चिंचवड शहराच्या चांगल्या आरोग्य साठी अपेक्षा आहे.
कृपया याबाबत तातडीने योग्य निर्णय घ्यावा असे निवेदनाद्वारे सूचना केल्या आहेत