शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोंना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणामध्ये आणण्यात महापालिका प्रशासन असमर्थ ठरताना दिसून येत आहे.लसीकरणासाठी नागरिकांची सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हेळसांड सुरु आहे.त्यामुळे लसीकरणाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे ई.मेल व्दारे केली आहे.
याबाबत बोलताना वाघेरे म्हणाले की, कोरोंना रुग्णासंख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाचा मोठ्या प्रमाणावर फायदा शहरातील नागरिकांना होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी ५० लाख लसींची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी येत्या दोन दिवसात जागतिक निविदा मागविण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर आपली महापालिका प्रशासन का पाऊले उचलत नाही याचा बोध होत नाही. आपल्याकडे मुबलक प्रमाणावर निधि उपलब्ध असताना प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु ज्या अधिकार्यांवर लसीकरणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे ते फक्त शहरातील नागरिकांना हे केले, ते होणार आहे, अश्या पद्धतीचा भास निर्माण करून नागरिकांच्या डोळ्यासमोर मृगजळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तहानेने व्याकुळलेले हरीण उन्हाच्या झळांना भुलून धावते धावते आणि शेवटी दमून मरून जाते….ते हे मृगजळ…त्याच पद्धतीची भावना नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे चांगल्या सुविधा मिळविण्यासाठी सर्व सामान्य नागरिक फक्त धावतोय … पण का? ते कुणालाच माहिती नाही? आपल्याकडे सक्षम यंत्रणा निर्माण व्यायला का वेळ लागत आहे, काय कमी आहे आपल्याकडे, प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी चालवलेला हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे असे मला वाटते आहे.
नागरिकांच्या भावनाचा आदर करीत लसीकरणाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश आयुक्तांनी त्वरित संबधित विभागास द्यावेत अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.