शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि विशेषत: यातील लहान मुलांची संख्या लक्षात घेता दुसऱ्या लाटेचे तिसऱ्या लाटेत संक्रमण होत आहे. वैद्यकीय तज्ञाकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलामध्ये संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असून ही बाब विचारात घेता, महापालिकेतर्फे वाय.सी.एम , नवीन जिजामाता , नवीन भोसरी, नवीन आकुर्डी, नवीन थेरगाव, या मनपाच्या रुग्णालयामधील एक हॉस्पिटल हे चाईल्ड कोविड केअर हॉस्पिटल म्हणून तयार करावे. भविष्यातील धोका लक्षात घेवून आणि लहान मुले कोरोनाने बाधित झाल्यास त्यांच्यासाठी चाईल्ड कोविड केअर हॉस्पिटल व चाईल्ड कोविड सेंटर उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे.असे मागणीचे निवेदन माजी विरोधी पक्ष नेते व विद्यमान नगरसेवक नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना दिले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे कि, उपाययोजना करताना लहान मुलांवर उपचार करण्यासाठी महापालिका हद्दीतील सर्व बालरोग तज्ञ डॉक्टरांची बैठक घेऊन मदत घेण्यात यावी. कोरोनाच्या काळात मनपाच्या व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, पॅरा मेडिकल स्टाफ यांनी चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आगामी पावसाळ्याच्या तोंडावर कोविड १९ आजाराबरोबरच इतर उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर उपचार सुविधा देण्यासाठी सज्ज राहून सेवा द्यावी.
प्रशासनाकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून लवकरात लवकर संबधित आरोग्य व वैद्यकीय विभागाला योग्य त्या सूचना देवून लहान मुलांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधायुक्त वैद्यकीय सुविधा निर्माण करव्यात, असे हि दिलेल्या निवेदनात नाना काटे यांनी म्हंटले आहे.