आयसीयूत रुग्णाची आत्महत्या; जिल्हाधिका-यांनी दिले चौकशीचे आदेश
शबनम न्यूज / पिंपरी
तळेगांव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज प्रशासनाचा कारभार संशायास्पद आहे. मेडिकल कॉलेज सक्षमपणे चालविण्यासाठी आवश्यक व्यवस्था, सोई-सुविधा नाहीत. कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कॉलेजमध्ये चालत असलेल्या अनागोंदी कारभाराची उच्चस्तरिय चौकशी करावी, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमनाथ हुलावळे या रुग्णाच्या आत्महत्येप्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
खासदार बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राष्ट्रीय मेडिकल कमिशनचे अध्यक्ष, केंद्रीय आरोग्य सचिव, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र पाठविले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगांव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेजमध्ये मंजूर असलेल्या क्षमतेने बेडची उपलब्धता नाही. मेडिकल कॉलेज सक्षमपणे चालविण्यासाठी ज्या व्यवस्था पाहिजेत. त्या व्यवस्था कॉलेजमध्ये नाहीत. अपुरा कर्मचारी वर्ग आहे. व्हेंटिलेटर अपुरे आहेत. पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर धूळखात पडून आहेत. त्याचा वापर केला जात नाही.
कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दोन दिवसांपूर्वी तिथे आयसीयूत उपचार घेत असलेल्या सोमनाथ हुलावळे या रुग्णाने आत्महत्या केली. त्याअगोदर पैसाअभावी कोरोनाने मृत्यू झालेला व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना दिला नव्हता. तब्बल तीन दिवस मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला होता. याप्रकरणी कॉलेज प्रशासनावर कलम 297 अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कॉलेज पैसे उकळते. परंतु, रुग्णांना त्याचा लाभ दिला जात नाही. हे अत्यंत संतापजनक आणि चुकीचे आहे. कॉलेजमध्ये यापूर्वीही गलथान कारभाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. पैशाच्या जोरावर सर्व घटना दाबल्या असून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी. मायमर मेडिकल कॉलेजमध्ये चालत असलेला अनागोंदी कारभाराला लगाम घालावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी पत्राद्वारे केली.
जिल्हाधिका-यांनी दिले चौकशीचे आदेश!
याबाबत खासदार श्रीरंग बारणे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनाही निवेदन दिले आहे. अतिदक्षता विभागात असलेला रुग्ण फाशी कसा घेतो. रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे का लावण्यात आले नाहीत. रुग्णाची मानसिक छळवणूक रुग्णालय प्रशासन, कर्मचाऱ्यांनी केली का, असे विविध प्रश्न उपस्थित करत सोमनाथ हुलावळे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या मायमर मेडिकल कॉलेजवर कारवाई करण्यात यावी. कॉलेजच्या गलथान कारभाराची चौकशी करावी अशी मागणी खासदार बारणे केली होती. त्यांच्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.
कॉलेज प्रशासनाच्या जाचाला कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी घेतली खासदार बारणे यांची भेट!
मायमर मेडिकल कॉलेजमधील कर्मचारीही प्रशासनाच्या जाचाला कंटाळले आहेत. कर्मचाऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांची आज भेट घेतली. त्यामध्ये स्टाफ नर्स, कर्मचारी, वॉर्ड बॉय या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
कॉलेज प्रशासन मनमानी कारभार करत आहे. प्रशासन जाच करत आहे. आम्हाला नाहक त्रास दिला जातो अशा विविध तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या. तसेच त्याबाबत कर्मचाऱ्यांनी लेखी पत्र खासदार बारणे यांना दिले आहे. आमच्यावरील अन्याय दूर करावा अशी विनंती केली.