शबनम न्युज / मुंबई
निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका संपल्या की दरवाढ ठरलेलीच! हे काय वित्त नियोजन आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. कोरोना संकटकाळात देशात व राज्यात होत असलेल्या इंधन दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालय वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा, असे मत जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे व्यक्त केले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९२.०५ रुपये आणि डिझेलची किंमत ८२.६१ रुपये प्रती लीटर झाली आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत १००.७५ पैसे किंमतीने तर डिझेलही ९०. ६८ रुपये दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर ९८.३६ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ८९.७५ रुपये प्रति लीटरवर पोहचले आहेत.